रायगड, 31 डिसेंबर: मुंबई -गोवा महामार्गावर (Mumbai- goa Highway)कशेडी घाटात खासगी बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. बस 50 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झाल्याचं समजतं. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. जखमींना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा...पुणेकरांना खूशखबर, PMPMLच्या ताफ्यात येणार 150 इलेक्ट्रिक बसेस!
मिळालेली माहिती अशी की, ही बस मुंबईहून देवगडला जात होती. कशेडी घाटात भोगावजवळ बस पोहोचली असता चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 50 फूट खोल दरीत कोसळली.
टॅक्टर दरीत पलटला; 2 जण जागीच ठार
पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर परिसरात आव्हाट इथं डबर वाहतूक करणाऱ्या टॅक्टरचा भीषण अपघात झाला. काल सायंकाळी झालेल्या या अपघातात टॅक्टरवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दत्ता पुनाजी आढळ (वय 33) आणि विलास गंगाराम बुरुड (वय 29 )असं अपघातात जागीच मृत्यू झाल्यांची नावे आहेत, तर संतोष सोमाजी किर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा...सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली, महाराष्ट्र पोलीस दलाचे सूत्र कुणाकडे?
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे एक्झिटजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जण जखमी झाले होते. 40 प्रवासी घेऊन जाणारी भरधाव बस रस्त्याच्या कडेला पलटली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उलटली आणि बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महामार्गालगतच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ही बस शहापूरहून (मुंबई) सांगलीकडे निघाली होती, अशी माहिती मिळाली आहे.