Home /News /mumbai /

चिंता मिटली! काळ्या बुरशीवरील इंजेक्शन पालिका खासगी रुग्णालयांना पुरवणार

चिंता मिटली! काळ्या बुरशीवरील इंजेक्शन पालिका खासगी रुग्णालयांना पुरवणार

BMC will supply injections to private hospitals: मुंबई महानगरपालिका आता खासगी रुग्णालयांना ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीवरील औषध पुरवणार आहे.

मुंबई, 26 मे: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराने सर्वांची चिंता वाढवली. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर प्रभावी असलेल्या औषधांचाही तुटवडाही निर्माण झाल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयातही (Private Hospitals in Mumbai) म्युकरमायकोसिसच्या अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने आता खासगी रुग्णालयांना ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच काळ्या बुरशीवरील अ‍ॅफोटेरिसीन बी (amphotericin b) इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका प्रथमच अशा प्रकारे एखादं औषध खासगी रुग्णालयांना देत आहे. रुग्णांचा जीव वाचणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आता काळ्या बुरशीवर प्रभावी असलेलं लायपोझोमल अ‍ॅफोटेरिसीन बी इंजेक्शन मुंबई महानगरपालिका खासगी रुग्णालयांना देणार आहे. मात्र, त्यासाठी रुग्णालयांना आपल्या रुग्णांची माहिती महानगरपालिकेच्या एपीड सेलकडे द्यावी लागणार आहे. हे औषध थेट रुग्णांना देण्यात येणार नाहीये तर रुग्णालयांनी आपल्याकडे दाखल असलेल्या रुग्णांच्या बाबतची माहिती पालिकेच्या एपीड सेलकडे दिल्यावर पालिका त्या रुग्णालयाला औषध पुरवठा करणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. खासगी रुग्णालयांनी आपल्याकडील म्युकरमाकोसिसच्या रुग्णांची माहिती मुंबई पालिकेला दिल्यावर दोन-दोन दिवसांचे इंजेक्शन या प्रमाणात बीएमसी खासगी रुग्णालयांना याचा पुरवठा करणार आहे. हेमंत देशमुख, डीन केईएम रुग्णालय यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले की, मुंबई महानगरपालिकेकडे ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीवर प्रभावी असलेले आणि रामबाण उपाय असलेले लायपोझोमल अ‍ॅफोटेरिसीन बी या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तर बाहेर या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे आता मुंबई मनपाकडून खासगी रुग्णालयांना हे इंजेक्शन देणार आहे. खासगी रुग्णालयातील 'या' रुग्णांना मोफत औषध मिळणार राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार करण्यात येतात. या योजने अंतर्गत खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना पालिकेकडून देण्यात येणारे अ‍ॅफोटेरिसीन बी इंजेक्शन हे मोफत देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 7000 रुग्ण, 200 बळी; कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात म्युकरमाकोसिस आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार केल्यास हा आजार बरा होतो. आता मुंबई मनपाने घेतलेल्या या निर्णयामुळे म्युकरमायकोसिसमुळे रुग्णांना आपले प्राण गमावावे लागणार नाहीयेत. या एका इंजेक्शनची किंमत 5800 रुपये इतकी असणार आहे. काही रुग्णांना दिवसाला सहा इंजेक्शन द्यावे लागतात. मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास तर मदत होणारच आहे. त्यासोबतच औषधांचा काळाबाजार आणि रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी लूट थांबेल.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Coronavirus

पुढील बातम्या