BMC ने दुप्पट दरात केली रेमडेसिवीरची खरेदी? भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

BMC ने दुप्पट दरात केली रेमडेसिवीरची खरेदी? भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

BMC ने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. या रुग्णांवर उपचार करण्याचा प्रचंड ताण मुंबईच्या आरोग्य यंत्रणेवर पडत आहेत. मुंबईतील अनेक कोरोना केंद्रावर बेडची कमतरता जाणवत आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडाही निर्माण झाला आहे. एकंदरित अशी परिस्थिती असताना BMC ने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील भाजप नेते विनोद मिश्रा यांनी BMC ला पत्र लिहून आरोपांबाबत उत्तर मागितलं आहे. त्यांनी आपल्या आरोपात म्हटलं की, 'रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यात मोठा घोटाळा करण्यात येत आहे. राज्य सरकारची संस्था असणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने 9 एप्रिल रोजी  57 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली आहे. यावेळी त्यांनी 665 रुपये 84 पैसे प्रति इंजेक्शन दराने रेमडेसिवीरची खरेदी केली आहे.

असं असताना, बीएमसीने तेच इंजेक्शन 7 एप्रिल 2021 रोजी 1568 रुपये प्रति इंजेक्शन दराने विकत घेतलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे नेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. यावेळी बीएमसीनं 2 लाख इंजेक्शनची खरेदी केली आहे. विनोद मिश्रा यांनी BMC ला पत्र लिहून याबाबत उत्तरही मागितलं आहे. त्यांच्या गंभीर आरोपानंतर पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(हे वाचा- भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा)

हाफकिन इन्स्टिट्यूट आणि बीएमसी या दोन्हीही संस्था राज्य सरकारच्या आहेत. असं असतानाही BMC ने इंजेक्शन खरेदी करण्यापूर्वी हापकिन किंवा राज्य सरकारशी संपर्क का केला नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच हाफकिन इन्स्टिट्यूटने 665 रुपये दराने रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी केली असताना BMC ने दुप्पट दराने खरेदी का केली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. या इंजेक्शन खरेदीत 18 कोटी 4 लाख रुपयांची रक्कम का देण्यात येत आहे? याचं स्पष्टीकरणही BMC ने द्यावं अशी मागणीही मिश्रा यांनी केली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 11:24 AM IST

ताज्या बातम्या