मुंबई, 12 जानेवारी : राज्यात भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजप (BJP) नेत्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) हात उचलल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी फोन करून आरोपींच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना भाजपच्या 3 कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर असं या तीन कार्यकर्त्यांची नाव आहे. हे तिघेही ट्रिपल सीट प्रवास करत होते. पोलिसांनी या तिघांना अडवले होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी तिन्ही कार्यकर्त्यांनी नितीन खैरमाडे यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले होते. या तिघांविरोधात पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिन्ही कार्यकर्ते घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात काम करतात. तसंच भाजपच्या आयटी सेल आणि इतर विभागातही काम पाहतात, अशी माहिती समोर आली आहे, याबद्दल महाराष्ट्र टाइम्स ने वृत्त दिले आहे. गरिबांच्या रॉबिनहूडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; युवा नेता होण्याची इच्छा अपूर्ण पोलिसांनी या तिन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर घाटकोपर मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम कदम यांनी पवई पोलिसांना फोन केला होता. राम कदम यांनी तिघांनी केलेल्या कृत्याचे निषेध केला. पण, माणुसकीच्या नात्याने या तिघांना सोडून द्या, कोर्टात खटला दाखल झाला तर या तिघांचे भविष्य अंधारात जाईल, या तिघांचेही लग्न झाले नाही, अशी विनंती राम कदम यांनी केली. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. परंतु, मुंबई पोलिसांवर हात उचलला हे चुकीचे आहे. हा माझ्या आणि महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांना सोडणे योग्य ठरणार नाही, असं म्हणून नितीन खैरमाडे यांनी राम कदमांची मागणी फेटाळून लावली. राम कदमांच्या विरोधात युवासेना रस्त्यावर ! दरम्यान, मुंबईतील पवई पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 भाजप कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात निषेधार्थ युवासेना मुंबईत अनेक ठिकाणा निदर्शेने करणार आहे. राम कदम यांनी सोमवारी पवई पोलीस ठाण्यातील कॉस्टेबल नितीन खैरमोडे यांना मारहाण करणाऱ्या 3 भाजप कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी फोन केले होते, त्यामुळे आरोपींना पाठीशी घालणाऱ्याविरोधात युवासेना निदर्शने करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







