मुंबई, 5 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोज महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील नेत्यांमध्ये नवनवीन किस्से घडत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावरील पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
'मुख्यमंत्री म्हणून बोलण्याची संधी आणि वेळही फडवणीस साहेब तुमच्यामुळेच आली,' असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी पुस्त प्रकाशनाच्या कार्यक्रमात लगावला होता. तसेच पुढील 5-10 वर्ष तुम्ही पुस्तकच लिहा असा सल्लाही दिला होता. त्याची विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असतानाच आज मात्र भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
'सहकारातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे सर्व चकवा देणारे आहेत. त्यांच्याशी फार नाद करू नका. तुम्ही भाजपाच्या विचारांचे आहात परत एकदा मागे या... परत या... परत या,' अशी साद मुनगंटीवार यांनी विधानसभेतच घातल्याने सभागृहात पुन्हा एकदा ठाकरे आणि भाजप चर्चेचा विषय झाला.
हेही वाचा- भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपाच्या नेत्यांवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय पुस्तकावर आधारित प्रकाशन सोहळ्यातही नोटबंदीचा विषय काढत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली.
विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशनला मुख्यमंत्री ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र होते. या दोन प्रमुख नेत्यांमध्ये परत एकदा मैत्री सुरू होत आहे, असं वातावरण असतानाच याच कार्यक्रमात ठाकरे यांनी मात्र भाजपाच्या नेत्यांवर नाराजी असल्याचं चित्र काही वक्तव्यावरून केलं होतं. आज परत एकदा मुनगंटीवार यांनी भाजपाकडून भाषणात बोलता-बोलता मुख्यमंत्री ठाकरे यांना साद घातली. त्यामुळे विधीमंडळात खरंच शिवसेना-भाजप परत येणार का, त्याबाबत चर्चा सुरू होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.