भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल

सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे

  • Share this:

सोलापूर, 04 मार्च : बनावट जातप्रमानपत्र प्रकरणी सोलापूरचे  भाजप खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमानपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी आज जयसिद्धेश्वर यांच्या विरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 156/ 3 प्रमाणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांच्या समोर अडचणी वाढल्या आहे.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून विजय मिळवणाऱ्या लिंगायत समाजातील आदरणीय गुरू असणाऱ्या जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती.

हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं.

जातीच्या दाखल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेणाऱ्या समितीचं काम दबावाखाली असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र, जिल्हा जात पडताळणी समितीने स्वामींचा अर्ज फेटाळून लावला. दक्षता समितीने अहवाल आपल्याला मान्य नसून आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं स्वामींच्या वकिलांनी सांगितले.

सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे याठिकाणी इतर जातीच्या उमेदवारांना निवडणूक लढवता येत नाही. जात पडताळणी समितीनं जयसिद्धेश्वर स्वामी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. या समितीच्या निर्णयाविरोधात स्वामी उच्च न्यायालयात दाद मागू शकतात.

First published: March 4, 2020, 11:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading