मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका : चित्रा वाघ यांचं खळबळजनक ट्विट

राज्य महिला आयोग अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका : चित्रा वाघ यांचं खळबळजनक ट्विट

चित्रा वाघ

चित्रा वाघ

BJP Chitra Wagh tweet: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 14 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर (Chairperson of State Women Commission) राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नियुक्ती होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. आता यावरुन नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय म्हटलं आहे चित्रा वाघ यांनी ?

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी सोडल्यानंतर चित्रा वाघ यांनी आतापर्यंत अनेकवेळा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आपला ऱोख व्यक्त केला आहे. आता चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये रावण उल्लेख केला आहे आणि हा उल्लेख नेमका कोणासाठी केला आहे यावरुन चर्चा रंगली आहे.

रुपाली चाकणकर यांना लवकरच मिळणार मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगाचे अध्यक्ष होत्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं, त्यामुळं आता चाकणकर यांची महिला अध्यक्ष पदी वर्णी लागणार आहे. तसंच अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.

गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: BJP, Chitra wagh, NCP