मुंबई 28 ऑक्टोंबर : राज्यात सत्तेतल्या वाट्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेल्या आकड्यांमुळे भाजप आता शिवसेनेच्या खिंडीत सापडलाय. त्यामुळे 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे. सत्तेत समान वाटा पाहिजे अशी शिवसेनेची मागणी असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे ठरलं त्याचं पालन केलं जावं असं शिवसेनेला वाटतं तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेला अडीच वर्ष देण्याला भाजप तयार नाही. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळूनही सत्तास्थापनेसाठी अजुनही हालचाली नाहीत. आधी फॉर्म्युला नंतर सत्तास्थापनेचा दावा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र आता भाजपनेही ‘प्लान-B’ तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राजकारणातली मोठी बातमी : या कारणांमुळे होतोय सत्ता स्थापनेस उशीर! शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास काय करायचं यावर भाजपमध्ये मंथन सुरू आहे. पक्षाने पर्यायी योजनाही तयार केलीय. शिवसेनेचे 15 ते 16 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. असं वृत्त ‘दैनिक लोकमत’नं दिलं आहे. शिवसेनेचे जे आमदार दोन तीन टर्म निवडून आलेत मात्र त्यांना पदं मिळाली नाहीत अशा आमदारांशी भाजपने संपर्क केला असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे होणार मंत्री? 288 जागांच्या विधानसभेत भाजपला 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेत. बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता असते. सध्याच्या स्थितीत भाजपला पूर्णपणे शिवसेनेवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षातले उट्टे काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढल्यामुळे दोघांसाठीही फार पर्याय उपलब्ध नाहीत. सध्या दबावाचं राजकारण सुरू असलं तरी तोडगा काढून दोघही एकत्र येतील आणि तोच खरा जनादेश आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली जातेय.
फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा!
निवडणुकीत 240 जागा मिळतील, विरोधी पक्ष हा फक्त नावापुरताच राहिल असा दावा भाजपने केला होता. मात्र निवडणुकीत हे सगळे दावे फोल ठरलेत. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला मात्र त्याला बहुमत मिळालं नाही. 2014 च्या जागाही भाजप कायम राखू शकला नाही. त्यामुळे थोडं नमतं घेऊन दोन्ही पक्ष पुढं येत सत्ता स्थापन करतील अशीच शक्यता व्यक्त केलीय जातेय.