मुंबई, 20 जुलै, प्रणाली कापसे : मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर यांच्यावर मुंबई महापालिकेतील कोव्हीड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीकडून बीएमसी कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात पाटकर यांना बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात.
त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. सुजित पाटकर यांच्यासह आणखी दोघांना अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. मोठी बातमी! कोव्हीड सेंटर घोटाळा प्रकरणात अखेर सुजित पाटकर ईडीच्या ताब्यात दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुजित पाटकर यांच्याशी संबंधित या प्रकरणात ईडीने राज्यात काही ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईत पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिन्स उभारण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांच्या घरावर हे छापे टाकले गेले होते. अखेर या प्रकरणात आता ईडनं सुजित पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.