• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • तब्बल 23 वर्षांनंतर मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

तब्बल 23 वर्षांनंतर मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

अखेर लढ्याला मोठं यश

 • Share this:
  सुस्मिता भदाणे/ मुंबई, 13 जुलै : मुंबई महानगर पालिकेने 580 कंत्राटी सफाई कामगारांना 23 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी कोर्टात लढा दिला होता. अखेर औद्योगिक न्यायालयानं या कामगारांना कायमस्वरुपी करावे असा निर्णय दिला आहे. हे काम इतकं सोपं नव्हतं. या कर्मचाऱ्यांना कोर्टकचेऱ्याच्या फेऱ्या आणि प्रशासकीय दडपशाहीचा पावलोपावली सामना करावा लागला, असं सांगितलं जात आहे. यापैकी 5 कामगारांना अटक करण्यात आली होती. कोणताही गुन्हा नसताना हे कर्मचारी 20 दिवस तुरूंगात होते. या काळात त्यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला होता. औद्योगिक कोर्टाने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांना 25 वर्षे जुन्या प्रकरणात 580 स्वच्छता कामगारांना नागरी संस्थेचे स्थायी कर्मचारी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे ही वाचा-मुख्यमंत्र्यांकडून माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप रोज मुंबई शहर स्वच्छ ठेवणाऱ्या या कामगारांना पालिकेने साधे हजेरी कार्डही दिले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. साप्ताहिक रजाही दिल्या जात नसल्याने वर्षाचे 365 दिवस त्यांना काम करावे लागत असे. सतत 10 तास घाणीमध्ये काम करूनही त्यांना आवश्यक सुविधा मिळत नव्हत्या. पालिका पत्रकाप्रमाणे १२७ रुपये रोज हा वेतन दर होता. पण प्रत्यक्षात 55 रुपये ते 60 रुपये रोखीने हातावर टेकवले जायचे. याचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले जात नसे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सफाई कामगारांना कायम करावे ही मागणी घेऊन कचरा वाहतूक श्रमिक संघाने 1999 मध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तेव्हापासून हा लढा सुरू होता. औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार या कामगारांना पालिकेला मागील काळातील थकीत रक्कमही द्यावी लागणार आहे. त्यानुसार प्रत्येक कामगाराला सुमारे 15 लाख रुपयांपर्यंतची थकीत रक्कम पालिकेला द्यावी लागेल, असे कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी सांगितले. परिणामी या 580 कामगारांना मागील 22 वर्षांच्या सेवा काळातील सुमारे 80 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पालिकेला द्यावी लागणार आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाने सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला 23 वर्षाच्या लढाईला यश मिळाले आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: