• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरोधात ACBने दाखल केला गुन्हा

चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरोधात ACBने दाखल केला गुन्हा

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांचे पति किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:
मुंबई, 27 फेब्रुवारी: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने (ACB) किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्यावर असा आरोप केला जात आहे की,  त्यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही बेहिशोबी आहे. 2016 मधील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे किशोर वाघ यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. किशोर वाघ यांच्यावर कलम 13 (1) (इ), कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 46 हजार 663 रुपये अधिकची संपत्ती आढळून आली आहे. शिवाय विविध शहरात असणारी त्यांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचा आरोप देखील केला जात आहे. किशोर वाघ हे मुंबईतील परेल याठिकाणी असणाऱ्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच दिनांक 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा आढळून आली. किशोर वाघ यांच्याकडे असणारी ही अपसंपदा त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतकी आहे. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1)E या कलमांतर्गत दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सध्या पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत असणाऱ्या चित्रा वाघ आता एका नवीन विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांच्या पतीची ही खुली चौकशी भाजपची राज्यात सत्ता असतानाच सुरू करण्यात आली होती. याच प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची तेव्हा चर्चाही रंगलीही होती.
Published by:Janhavi Bhatkar
First published: