Home /News /mumbai /

अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी शिवसैनिक', मग राजीनाम्याची पुडी सोडली कोणी?

अब्दुल सत्तारांनी सोडलं मौन, म्हणाले 'मी शिवसैनिक', मग राजीनाम्याची पुडी सोडली कोणी?

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे कुणीही फुठलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची माणसं फुटली

    मुंबई,5 जानेवारी: कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. राजीनामा नाट्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले. ते म्हणाले, 'मी नाराज नाही. मला दिलेल्या खात्यांवर मी समाधानी आहे. मी राजीनामा दिला नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. माझं साहेबांशी बोलणं झालं आहे. मी उद्या (सोमवार) सायंकाळी पाच वाजता पुन्हा मातोश्रीवर येणार असून त्यानंतर सविस्तर बोलेल असे सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले. आणखी काय म्हणाले अब्दुल सत्तार? जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे कुणीही फुठलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची माणसं फुटली, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. काही बाबी या पक्षाअंतर्गत असतात. त्यावर मुख्यमंत्री बोलतील. इतर नेत्यांशीही मुख्यमंत्री चर्चा करतील, असेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले. राजीनाम्याची पुडी कोणी सोडली? अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. शिवसेनेची बदनामी व्हावी, यासाठी माझ्या राजीनाम्याची पुडी सोडल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याची पुडी कोणी सोडली, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आता याची शहानिशा मुख्यमंत्री करतील, असे सत्तार यांनी यावेळी सांगितले. मग, सगळं काही अलबेल असताना अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, राज्यातील सरकार स्थिर असून अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही. विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत गुंतागुंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 'सत्तार हे गद्दार', 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका.. महाविकासआघाडीच्या खातेवाटप होण्याआधीच सेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. एवढंच नाहीतर सत्तार यांच्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेला फटका बसला. सत्तार यांच्या या कृतीवर सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले होते. अब्दुल्ल सत्तार हे गद्दार असून त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, अशी सडकून टीका खैरेंनी केली होती. 'महाविकासआघाडीमुळे अब्दुल सत्तार हे मंत्री झाले. तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तार यांच्यामुळे भाजपला मदत मिळाली. सत्तार यांनी सेनेशी गद्दारी केली आहे. आम्ही शिवसेना मोठ्या कष्टाने उभी केली आहे. आज महाविकासआघाडीमुळे मंत्री झाल्यानंतर असं वागणे हे सहन करण्यापलीकडे आहे. सत्तार हे गद्दार आहे. त्यांना 'मातोश्री'वर पाय ठेवू देऊ नका. मुंबईतले शिवसैनिकही त्यांना मातोश्रीवर पाय ठेवू देणार नाही', अशी संतप्त प्रतिक्रिया खैरे यांनी काल दिली होती. जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही नाराजी सध्या राज्यभर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सत्तार यांनी शिवसेनेपासून वेगळी भूमिका घेत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्तार यांच्या राजीनाम्यामागे जिल्हा परिषद निवडणुका हेदेखील कारण असल्याचं सांगितलं जात आहे. काय घडलं औरंगाबाद महापालिकेत? औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. अब्दुल सत्तार यांची समजूत काढल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र, अब्दुल सत्तार यांचा निरोप शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारापर्यंत पोहोचलाच नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदअध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाताई शेळके यांचा विजय झाला आहे तर उपाध्यक्षपदी भाजप चे एल.जी.गायकवाड विजयी झाले आहेत. या निवडणुकीत माजी अध्यक्षा देवयानी डोनगवकर यांचा पराभव झाला आहे. अध्यक्ष पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान 30-30 मते पडली होती. त्यानंतर इश्वर चिठ्ठीत शेळके यांचा विजय झाला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेते अर्जुत खोतकर यांनी सत्तार यांची समजूत काढली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत तसं घडलंच नाही आणि ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. दरम्यान, शुक्रवारीदेखील औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही गटाला समसमान मतदान पडल्याने प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार देवयानी डोनगावकर यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यानंतर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्याच अध्यक्षा देवयानी डोनगावकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Abdul sattar, CM maharashtra, Maharashtra news, Maharashtra politics, Udhav thackeray

    पुढील बातम्या