Home /News /mumbai /

मुंबईकरांवर बाप्पाने केली कृपा! गणेशोत्सवातच मिळाली मोठी GOOD NEWS

मुंबईकरांवर बाप्पाने केली कृपा! गणेशोत्सवातच मिळाली मोठी GOOD NEWS

मुंबईकरांना कोरोनाबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई, 16 सप्टेंबर : सणासुदीच्या काळात कोरोना अधिक हातपाय पसरेल याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे गणेशोत्साव काळात सरकार, प्रशासन सर्वांचं टेन्शन वाढलं आहे. पण याच काळात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे (Coronavirus in Mumbai). गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांना मोठी गूड न्यूज मिळाली आहे (Mumbai sero survey report). मुंबईतील 70 ते 80 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज (Corona antibodies found in Mumbaikar) विकसित झाल्या आहेत. मुंबईतील कोरोनाच्या पाचव्या सिरो सर्व्हेतून ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेत (BMC) शहरात पाचवा सिरो सर्व्हे केला. 24 वॉर्डमधील 8000  नमुने जमा करण्यात आले. यामध्ये लस घेतलेले आणि लस न घेतलेले नागरिकही होते. फक्त लहान मुलांचा यात समावेश नाही. प्रौढ नागरिकांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये 70 ते 80 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज असल्याचं दिसलं. हा सविस्तर रिपोर्ट मुंबई महापालिका उद्या जारी करण्याची शक्यता आहे. सिरो सर्व्हे म्हणजे नेमकं काय? कोरोना विषाणूविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज (Antibodies Survey) किती जणांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, याचा माग या सर्व्हेतून घेतला जातो. रोगाचा प्रसार नेमका किती झाला आहे, याचं मोजमाप करण्यासाठी हे उपयुक्त साधन आहे. किती टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला आहे, याचं प्रमाण कळण्यासाठी सेरो सर्व्हेज घेतले जातात, असं आयसीएमआरने म्हटलं आहे. लक्षणं नसलेल्या कोरोनाबाधितांचाही त्यात समावेश असतो. अर्थात केवळ एवढाच त्याचा उद्देश नाही. जास्त जोखीम असलेल्या गटातल्या लोकसंख्येला संसर्ग होण्याचा किती धोका अन्य लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे, याचा अंदाज यावरून बांधता येतो. उदा. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, इत्यादी. त्यामुळे त्या संबंधित गटानुसार योग्य ती कार्यवाही करणं आरोग्य यंत्रणेला शक्य होऊ शकतं. हे वाचा - Corona Alert : लसीची परिणामकारकता हळूहळू होते कमी, अनेक देशांत तिसरा डोस सुरू जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन (Dr Saumya Swaminathan) यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला कोविड-19 होऊन गेल्यानंतर त्याची प्रतिकारशक्ती किती काळ टिकते, याचा माग काढण्याची संधीही सेरो सर्व्हेतून मिळते. एकाच गटाचे सेरो सर्व्हे ठरावीक कालावधीच्या अंतराने घेतले, तर त्या विषाणूविरोधात किती प्रतिकारशक्ती (Immunity) विकसित झाली आहे, हे समजून घेता येऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे, अजूनपर्यंत कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही, याची माहिती सेरो सर्व्हेतून कळते. त्यामुळे कोणत्या लोकसंख्येच्या गटाला अद्याप संसर्गाचा धोका आहे आणि त्या गटाला हर्ड इम्युनिटी प्राप्त करेपर्यंत किती उद्दिष्ट साध्य करायचं आहे, याचा अंदाज त्यावरून बांधता येतो.  हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे का? लोकसंख्येच्या ठरावीक गटातल्या पुरेशा लोकसंख्येमध्ये संसर्गाविरोधात अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतील, तर त्या रोगाचा पुढचा प्रसार थांबू शकतो. कारण त्याला संसर्ग करण्यासाठी नव्या व्यक्ती सापडत नाहीत. या अँटीबॉडीज संबंधित रोग झाल्यामुळे किंवा लसीकरणाद्वारे (Vaccination) तयार झालेल्या असू शकतात. या स्थितीला हर्ड इम्युनिटी अर्थात सामूहिक प्रतिकारशक्ती असं म्हणतात. हर्ड इम्युनिटी तयार झाल्यास अँटीबॉडीज नसलेल्या अन्य व्यक्तींचं संसर्गापासून संरक्षण होतं. मुंबईकरांमध्ये हर्ड इम्युनिटी आली का? हर्ड इम्युनिटीचं प्रमाण रोगानुसार वेगवेगळं असतं. गोवरसारख्या (Measles) प्रचंड संसर्गजन्य असलेल्या रोगाच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 94 टक्के व्हावं लागतं. म्हणजेच 10पैकी 9 व्यक्ती एक तर रोगातून बऱ्या झालेल्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचं लसीकरण तरी झालेलं असलं पाहिजे; पण गोवरसारख्या अन्य रोगांचं लसीकरण ही खूप सर्वसामान्य गोष्ट असल्याने अशा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असल्याचं आपल्याला दिसत नाही. तुरळक केसेसच पाहायला मिळतात. कोरोना विषाणूच्या बाबतीत हर्ड इम्युनिटीचं प्रमाण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत असणं अपेक्षित आहे. याचाच अर्थ असा, की दर पाच व्यक्तींमागे चार व्यक्तींच्या शरीरात त्याविरोधातल्या अँटीबॉडीज असल्या पाहिजेत. मुंबईने सध्या हा टप्पा गाठला आहे. त्यामुळे मुंबईत हर्ड इम्युनिटी आली का असा प्रश्नही आता उपस्थित होतो आहे. हे वाचा - झुंज यशस्वी! तब्बल 130 दिवसांचा कोरोना, रुग्ण सांगतोय अनुभव पण नव्या स्ट्रेन्स आल्या तर हर्ड इम्युनिटी निष्प्रभ ठरू शकते. तसंच, लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना निष्प्रभ करण्याची क्षमता एखाद्या स्ट्रेनमध्ये असेल, तर हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) प्राप्त करण्यात अडथळा होतो. त्यामुळे हा दिलासा असला तरी बिनधास्त राहून चालणार नाही. कोरोना नियमांचं पालन करायलाच हवं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या