• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • तब्बल 130 दिवस कोरोनाशी झुंज; मृत्यूवर मात करुन घरवापसी, रुग्ण सांगतोय अनुभव

तब्बल 130 दिवस कोरोनाशी झुंज; मृत्यूवर मात करुन घरवापसी, रुग्ण सांगतोय अनुभव

काही रुग्ण सकारात्मक वृत्तीमुळे चिवटपणे दीर्घ काळ झुंज देऊन कोरोनाला हरवत आहेत. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर:  देशभरात गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीत (Coronavirus pandemic) आतापर्यंत कोट्यवधी जणांना याची लागण झाली आहे, तर लाखो जणांचा बळी गेला आहे. अनेक रुग्णांवर प्रदीर्घ काळ उपचार करावे लागत आहेत. काहींची झुंज अकाली संपत आहे, तर काही रुग्ण सकारात्मक वृत्तीमुळे चिवटपणे दीर्घ काळ झुंज देऊन कोरोनाला हरवत आहेत. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) एका जिद्दी तरुणाची. त्यानं तब्बल 130 दिवस कोरोनाच्या विषाणूशी झुंज देऊन अखेर मृत्यूवर मात केली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठचा (Meerut) रहिवासी असलेला विश्वास सैनी (Vishwas Saini) 130 दिवसांनंतर रुग्णालयातून आपल्या घरी गेला आहे. अजूनही काही काळ त्याला ऑक्सिजन सपोर्टची (Oxygen Support) गरज आहे. विश्वास सैनी याला 28 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सुरुवातीला घरीच त्याच्यावर उपचार सुरू होते; पण नंतर त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या वेळी त्याची स्थिती इतकी गंभीर होती, की डॉक्टरांनीही त्याच्या जगण्याची आशा सोडली होती; पण विश्वासची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यामुळे त्याने या संकटावर मात केली. जवळपास महिनाभर त्याला ऱ्हिदम व्हेंटिलेटरवर (Ventilator) ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले. सकारात्मक वृत्तीमुळेच (Positive attitude) तो यातून बरा झाला, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणारे डॉ. एम. सी. सैनी (Dr. M. C. Saini) यांनी दिली. रुग्णालयात थोडेथोडके नव्हे, तर चार महिन्यांहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर सुखरूप घरी परतलेल्या विश्वासने स्वतः आपला हा अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘मला कोरोनाची लागण झाली तेव्हा प्रचंड भीती वाटली. कारण माझ्या आजूबाजूला कोरोनामुळे अनेक जण मरण पावताना पाहत होतो. त्यामुळे आपणही यातून वाचणार नाही, असं मला वाटत होतं; पण माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर्स मला सतत धीर देत होते. प्रोत्साहन देत होते. डॉक्टरांच्या उत्तम उपचारांमुळे आणि प्रेरणेमुळे मला बळ मिळालं आणि मी बरं होण्यावर लक्ष केंद्रित केलं. इतर कोणत्याही विचारांना मनात थारा दिला नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या, डोळ्यात प्राण आणून मी बरा होण्याची वाट पाहणाऱ्या माझ्या कुटुंबाचा मी विचार केला. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद यामुळे मी यातून बरा होऊन पुन्हा त्यांच्यासोबत घरी परत आलो आहे. ही अतिशय आश्चर्यकारक बाब आहे.’ हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांच्या खांद्यावर नवी जबाबदारी विजिगीषू वृत्ती आणि सकारात्मकता याच्या बळावर इतका प्रदीर्घ काळ उपचार घेऊन कोरोनावर मात करणाऱ्या विश्वास सैनीची सध्या सर्वत्र चर्चा असून, त्याची ही कहाणी कोरोना रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Published by:Pooja Vichare
First published: