वॉशिंग्टन, 06 जानेवारी: आर्थिक वर्ष 2020-2021 दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian Economy) 9.6 टक्के घसरण होण्याचा अंदाज जागतिक बँकेनं (World Bank) वर्तवला आहे. सर्वसामान्य लोकांच्या घर खर्चातील कपात (Household Spending) आणि खासगी गुंतवणुकीत (Private Investment) मोठी घट होण्यानं अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्याचवेळी 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर (Economic Growth) 5.4 टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही जागतिक बँकेनं वर्तवला आहे.
सेवा आणि उत्पादन क्षेत्रात सुधारणा
जागतिक बँकेनं आर्थिक अंदाज अहवालात म्हटलं आहे की, कोरोनाच्या साथीमुळं रोजगार निर्मितीत 80 टक्के हिस्सा असलेल्या असंघटित क्षेत्राची (Informal Sector) मोठी हानी झाली असून, उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. या जागतिक साथीचा आधीच घसरणीचा कल असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार, सेवा आणि उत्पादन क्षेत्रात (Service & Manufacturing Sector) सुधारणा होत आहे. कोरोनामुळे एनपीए वाढल्यानं वित्तीय क्षेत्राची (Financial Sector) स्थिती आधीच खराब होती.
(हे वाचा-ICICI Lombard आपल्या ग्राहकांना देऊ करते घरगुती आरोग्य सेवेचे लाभ)
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर ताण कायम
भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा दर 0.5 टक्के राहील. यात अधिक वाढीची शक्यता नाही. पाकिस्तानात आर्थिक निधी वाढवण्यावरील दबाव आणि सेवा क्षेत्रातील उणीवा यामुळं अर्थव्यवस्थेच्या वाढीवर दबाव कायम राहणार आहे. जागतिक बँकेनं असंही म्हटल आहे की, उर्वरीत दक्षिण आशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोविड 19 च्या साथीचा प्रभाव आहे, मात्र त्याची तीव्रता कमी आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये याचा मोठा परिणाम दिसून आला. यामध्ये मालदीव, नेपाळ, श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे.
(हे वाचा-घरातील सोन्यावर व्याज मिळवण्याची संधी, सरकार या योजनेत बदल करण्याच्या तयारीत)
जागतिक अर्थव्यवस्थेत 4 टक्के वाढीची अपेक्षा
वर्ष 2021 मध्ये दक्षिण आशियाच्या अर्थव्यवस्थेत 3.3 टक्के तर जागतिक अर्थव्यवस्थेत 4 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनावरील लसीला मंजुरी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्तवण्यात आलेला हा अंदाज कोरोनाची साथ पसरण्यापूर्वीच्या 5 टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 3.8 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, 2020-21 आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत 4.3 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: World bank