मराठी बातम्या /बातम्या /मनी /Digital gold: डिजिटल गोल्डकडे ग्राहकांचा कल; काय आहे महत्त्व?

Digital gold: डिजिटल गोल्डकडे ग्राहकांचा कल; काय आहे महत्त्व?

gold

gold

कोरोना संकटाच्या(Corona) अनिश्चित वातावरणात भांडवली बाजार किंवा गुंतवणुकीच्या इतर साधनांऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला लोक जास्त प्राधान्य((Gold ) देत आहेत.

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: वेगानं बदलणाऱ्या आजच्या जगात कोणत्याच वस्तूची किंमत स्थिर किंवा भरवश्याची राहिलेली नाही. परंतु, सोनं मात्र या निकषांवर अगदी सोळा आणे खरं आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या(Corona) अनिश्चित वातावरणात भांडवली बाजार किंवा गुंतवणुकीच्या इतर साधनांऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला लोक जास्त प्राधान्य(Gold ) देत आहेत. केवळ दागिने खरेदी करण्याऐवजी डिजिटल गोल्ड(digital gold) खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

    सध्याच्या बदलत्या काळात सोन्याचं स्वरूप आणि रंगातही बदल होताना दिसतोय. परंतु, लोकांचा सोन्यावरचा विश्वास मात्र आजही कायम असून, तो अधिक दृढ होताना दिसत आहे. कोरोनाकाळात बाजारातील स्थिती आपण अनुभवली. या कालावधीत बाजारात चढउतार पाहायला मिळाले. यापूर्वी लोक जमीन  घरांमध्ये गुंतवणूक करत होते. मात्र, आता गुंतवणूकीच्या  दृष्टीकोनातून ही क्षेत्र खात्रीची राहिलेली नाहीत.

    सोन्याबाबत बोलायचं झालं तर आता सोनंही डिजिटल (Digital) झालं आहे. जे लोक सोन्याकडं फारसं लक्ष देत नव्हते, तेदेखील या डिजिटल गोल्डकडं (Digital Gold)आकर्षित होत आहेत. भलेही सोन्याचा दर 48 ते 50 रुपये तोळा असला तरी सामान्य नागरिक आता त्यात गुंतवणूक करू शकतात. कारण आता सोनं खरेदीसाठी एक लाख किंवा 50 हजार रुपयांची गरज नाही. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या अर्थिक कुवतीनुसार ते खरेदी करू शकता. भारतातील नागरिकांसाठी डिजिटल गोल्ड हा सोन्याचा प्रकार खूपच नवा आहे.

    हे वाचा- Sim Card द्वारे एका सेकंदात खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, खबरदारी घ्या

    अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर डिजिटल गोल्ड हा सोनं या धातूमध्ये गुंतवणूक करण्याचा एक नवा प्रकार आहे. डिजिटल गोल्ड ऑनलाइन (Online) पध्दतीनं खरेदी किंवा विक्री केलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे या प्रक्रियेत अस्सल म्हणजेच हॉलमार्क (Hallmark) असलेलं 24 कॅरेट सोनं अगदी सहजपणे खरेदी- विक्री केलं जाऊ शकतं.

    जर तुम्ही या नाविन्यपूर्ण डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर या विषयीच्या काही बाबींची माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊया या बाबींविषयी...

    डिजिटल गोल्ड आणि फिजिकल सोनं

    शुध्दता हे डिजिटल गोल्डचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तुम्ही हॉलमार्क असलेलं 24 कॅरेट शुद्ध सोनं डिजिटल माध्यमाव्दारे खरेदी करू शकता. अगदी घरबसल्या मोबाइल फोनच्या माध्यमातून काही मिनिटांत तुम्ही सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. या तंत्रज्ञानामुळे सोनं खरेदी आणि विक्री सर्वांसाठी सुलभ झाली असून, ती सर्वांच्या आवाक्यात देखील आली आहे.

    सोन्याचे दागिने, नाणी किंवा अन्य वस्तू सजावट किंवा दिखाव्याच्या उद्देशानं खरेदी केल्या जातात. अशा वस्तु तयार करण्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे या गोष्टी डिजिटल गोल्डच्या तुलनेत महाग असतात. कारण ज्या वजनाचे सोन्याचे दागिने तुम्ही आज खरेदी करता, त्यांची काही कालावधीनंतर विक्री करायची झाली तर त्यात घट, भेसळ धरून त्याचे वजन कमी धरले जाते.

    हे वाचा- रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते काळी मिरी; या गोष्टींवरही आहे गुणकारी

    सोनं हा एक बहुमोल धातू आहे. त्यामुळे त्याचं संरक्षण काळजीपूर्वक करावं लागतं. कधीकधी अशी परिस्थिती अशी निर्माण होते की मोठ्या कष्टाने जमवलेलं सोनं तुमच्या संपत्तीत कमी महत्त्वाचं ठरतं. सोनं घरात ठेवणं सुरक्षित नसतं. तसेच सोन्याचे दागिने परिधान करून तुम्ही बाहेर फिरू शकत नाही. कारण चोरीची घटना घडून प्रसंगी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही बॅंकेत सोनं ठेवलं तर त्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर स्मार्ट गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून धातु रुपातील सोनं योग्य पर्याय ठरत नाही.

    डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक

    सोन्याचा वापर आणि खरेदीबाबत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा खरेदीदार देश आहे. आपल्याकडे दागिन्यांव्यतरिक्त सोन्याचा वापर भेट देण्यासाठी किंवा संपत्तीच्या (Property) रुपात होतो. जे लोक सोनं साठवू इच्छितात त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. फिजीकल गोल्डमध्ये गुंतवणूक करणं हा अधिक सोपा आणि कमी खर्चिक व्यवहार आहे. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाजारात आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करून त्याबदल्यात फिजीकल गोल्ड खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, बँकिंग किंवा कोणत्याही पेमेंट अॅपच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड अगदी सहजपणे खरेदी करू शकता.

    फिजीकल गोल्ड आणि डिजिटल गोल्डमध्ये चांगला पर्याय कोणता?

    आपल्याकडं सणा-सुदीला सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. विवाह किंवा अन्य शुभप्रसंगी भेट म्हणून सोनं दिलं जातं. लग्नसोहळ्यांच्या कालावधीत सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. विवाहाच्या एकूण बजेटपैकी 50 टक्के खर्च हा केवळ सोन्यावर केला जातो. सोनं हे मालमत्ता स्वरुपातही जतन केलं जातं. पुढील पिढ्यांना ते वारसाहक्कानं दिलं जातं. सोनं हे आपण कोणत्याही सराफाकडून खरेदी करू शकतो. परंतु, त्याच्या विश्वासार्हतेविषयी आपल्या मनात कायम शंका राहते. त्यात काही ना काही कमतरता जाणवल्यानं ही शंका आपल्या मनात निर्माण होते.

    तुलनेनं डिजिटल गोल्डमध्ये अशी कोणतीही समस्या नसते. तुम्ही तुमच्या अर्थिक कुवतीनुसार डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. फिजीकल सोनं विकायचं झाल्यास तुम्हाला ज्वेलरशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसतो. परंतु, डिजिटल गोल्ड तुम्ही अगदी घरबसल्या विकू शकता आणि त्याचे पैसे थेट तुमच्या बॅंक खात्यावर जमा होतात. डिजिटल गोल्ड विकताना घट किंवा खोट येत नसल्यानं किंमत कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) किंवा मोबाईल रिचार्ज करण्याइतकं डिजिटल गोल्ड खरेदी करणंही सोपं आहे. त्यामुळे तुम्हाला दागिने किंवा फिजीकल सोनं खरेदी करायचं असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर डिजिटल गोल्ड हा उत्तम पर्याय आहे. तसेच दागिन्यांप्रमाणेच तुम्ही डिजिटल गोल्ड हे देखील एखाद्या व्यक्तीस भेट म्हणून देऊ शकता.डिजिटल गोल्डचे अनेक प्रकार आहेत. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकीसाठी ईटीएफ आणि गोल्ड फंड या लोकप्रिय पध्दती आहेत. तुम्ही डिजिटल गोल्ड तुमच्या मोबाइल ई-वॉलेट (E-Wallet) किंवा युपीआय आयडीच्या माध्यमातूनही खरेदी करू शकता.

    First published:

    Tags: Gold, Gold bond, Investment, The gold