मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Wedding Season: देशभरात एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

Wedding Season: देशभरात एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

14 नोव्हेंबर 2021 ते 13 डिसेंबर 2021 या एका महिन्याच्या कालावधीत देशभरात जवळपास 25 लाख विवाह होणार असल्याचा अंदाज आहे. विवाहांच्या या हंगामात जवळपास 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.

 नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोना विषाणू संसर्गामुळे (Coronavirus Pandemic) बाजारपेठांमध्ये अक्षरशः सन्नाटा होता. त्यानंतर यंदाच्या दिवाळीत (Diwali 2021) बाजारपेठा गजबजल्या आणि विक्रमी उलाढालही झाली. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आता देशभरातले व्यापारी विवाहाच्या हंगामासाठी सज्ज होत आहेत. साधारणतः दिवाळीनंतर तुळशीचं लग्न झालं, की विवाह मुहूर्तांना (Wedding Season in India) सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा 14 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशीनंतर विवाह मुहूर्तांना (Marriage Celebrations) सुरुवात होते आहे. 14 नोव्हेंबर 2021 ते 13 डिसेंबर 2021 या एका महिन्याच्या कालावधीत देशभरात जवळपास 25 लाख विवाह होणार असल्याचा अंदाज आहे. विवाहांच्या या हंगामात जवळपास 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT चा असा दावा आहे, की या कालावधीत एकट्या दिल्लीतच 1.5 लाखांहून अधिक विवाहसोहळे होणार आहेत. त्यामुळे दिल्लीतच जवळपास 50 हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचा-आज पेट्रोल-डिझेल दरवाढीला लगाम लागला आहे का? काय आहे आजचा भाव

CAIT च्या आध्यात्मिक आणि वैदिक ज्ञान समितीचे अध्यक्ष आचार्य दुर्गेश तारे यांनी सांगितलं, की नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे शुभमुहूर्त 14, 28, 29, 30 या तारखांना, तर डिसेंबर महिन्यात 1, 6, 7, 8, 9, 11, 12, 13 या तारखांना आहेत. त्यानंतर शुभकार्यांचे मुहूर्त 14 जानेवारी 2022नंतर सुरू होतील. CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं, की विवाहांच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता गृहीत धरून देशभरातल्या व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे. त्यांनी सांगितलं, की प्रत्येक विवाहाचा साधारणतः 80 टक्के खर्च विवाहाशी संबंधित कामं करणाऱ्या त्रयस्थ एजन्सीजवर केला जातो.

भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितलं, की विवाहांच्या हंगामाच्या आधी घरांची दुरुस्ती, रंगकाम आदी कामं केली जातात. ज्वेलरी, साड्या, लेहंगे, रेडिमेड कपडे, फूटवेअर, लग्नपत्रिका, ड्रायफ्रूट्स, मिठाया, फळं-फुलं, पूजासाहित्य, किराणा सामान, खाद्यपदार्थ, डेकोरेशनचं साहित्य, लायटिंगचं साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स यांसह गिफ्ट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

CAIT ने सांगितलं, की दिल्लीसह देशभरातले बँक्वेट हॉल्स, हॉटेल्स, खुली लॉन्स, फार्म हाउसेस विवाहसोहळ्यांसाठी सज्ज आहेत. जवळपास प्रत्येक विवाहसोहळ्यात टेंट, डेकोरेटर, फुलांची सजावट करणाऱ्या व्यक्ती, क्रॉकरी, केटरिंग सर्व्हिस, ट्रॅव्हल सर्व्हिस, कॅब सर्व्हिस, स्वागताचं काम करणारे प्रोफेशनल ग्रुप्स, भाजी विक्रेते, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, बँडवाले, ऑर्केस्ट्रा, घोडे-बग्गीवाले, लाइटिंगचं काम करणारे अशा कित्येक जणांच्या हाताला खूप काम मिळतं.

हे वाचा-15 नोव्हेंबरला आहे जबरदस्त कमाईची संधी, येतोय आणखी एका कंपनीचा IPO

नोव्हेंबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या विवाहाच्या हंगामात सुमारे पाच लाख विवाहसोहळ्यांमध्ये प्रत्येकी सुमारे दोन लाख रुपये खर्च होतील, असा CAITचा अंदाज आहे. तसंच, सुमारे पाच लाख विवाहसोहळ्यांमध्ये प्रत्येकी सुमारे पाच लाख रुपये खर्च होतील. 10 लाख विवाहांमध्ये प्रत्येकी 10 लाख रुपये, 4 लाख विवाहांमध्ये प्रत्येकी 25 लाख रुपये, 50 हजार विवाहांमध्ये प्रत्येकी 50 लाख रुपये, तर 50 हजार विवाहांमध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये किंवा त्याहून जास्त खर्च केला जाणार असल्याचा अंदाजही CAIT ने वर्तवला आहे. या सगळ्याची गोळाबेरीज केली, तर या एका महिन्यात बाजारात तब्बल 3 लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. एकंदरीतच त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळायला मदत होणार आहे.

First published:

Tags: Wedding, Wedding video