मुंबई, 04 मार्च: भारत हा विविध संस्कृतींनी (Indian culture) नटलेला देश आहे. आपल्या देशात पर्यटनासाठी (Tourism in India) निसर्गरम्य ठिकाणं तर आहेतच पण विविध राज्यांची खाद्य संस्कृती हीदेखील भटकंतीची आवड असणाऱ्या लोकांसाठी आणि खवय्यांसाठी मेजवानी ठरते. जर आपण उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे प्रवास केला तर प्रत्येक पावलावर आपल्याला अतुल्य भारताचं सौंदर्य अनुभवता येतं. आपल्याला प्रवासाची कितीही आवड असली तरी आपण प्रत्येकवेळी प्रवासावर हजारो रुपये खर्च करू शकत नाही. आता उन्हाळा जवळ आला आहे त्यामुळे अनेकांच्या डोक्यात फिरायला जाण्याचे विचार सुरू असतील. कारण तुम्हाला घरातून बाहेर पडून देशातील निसर्गरम्य स्थळांचा आनंद घ्यायचा असेल तर हिच योग्य वेळ आहे. पण एखादा प्लॅन करताना बजेट वाढलं की मग हिरमोड होतो. त्यामुळे, जर तुम्हाला पर्यटनाला जायची इच्छा असेल पण तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्ही देशातल्या या ठिकाणांना भेट देऊन तुमची इच्छा कमी खर्चात पूर्ण करू शकता. पाहा देशातली पाच स्वस्त आणि मस्त ठिकाणं. हे वाचा- #HumanStory: जन्मभर केली लाकूडतोड; सत्तरीत सुरू झालं नवं करिअर पुद्दुचेरी पुदुच्चेरी हा दक्षिण किनारपट्टीवरील केंद्रशासित प्रदेश हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. हे ठिकाण त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखलं जातं. तुम्ही इथं गेल्यास तुम्हाला फ्रान्समध्ये आल्याचा अनुभव देतं. तुम्ही या ठिकाणी सर्वोत्तम फ्रेंच पदार्थदेखील खाऊ शकता. तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही इथं श्री अरबिंदो आश्रमात राहू शकता. हा आश्रम तुम्हाला योग, ध्यान, समुद्रकिनारा फिरणं आणि मोफत जेवणाची सुविधा पुरवतो. दार्जिलिंग पश्चिम बंगालमधील हे हिल स्टेशन भारतातील सर्वांत स्वस्त पर्यटन स्थळांपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. इथे असंख्य चहाच्या बागा, पर्वतरांगा आणि मनमोहक दृश्यं पाहायला मिळतात. हे ठिकाण अत्यंत परवडणारं आहे. इथं थांबण्यासाठी खूप चांगले पर्याय उपलब्ध असून रस्ता, विमान आणि ट्रेनची चांगली कनेक्टिव्हिटी आहे. इथल्या नयनरम्य ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही टॉय ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. पुष्कर राजस्थानमधील पुष्कर हे शहर पर्यटकांच्या आवडीचं आहे. पुष्कर त्याच्या उंट सवारी, टेस्टी स्ट्रीट फूड, राजवाडे, मार्केट यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अजमेर जंक्शनला जाण्यासाठी बजेट-फ्रेंडली ट्रेनचा पर्याय निवडून तुम्ही पुष्करला भेट देऊ शकता आणि नंतर तिथली सार्वजनिक वाहतूक सेवा वापरून फिरू शकता. इथं राहण्यासाठी तुम्हाला स्वस्तात चांगले पर्याय मिळतात. हे वाचा- चुकूनही समोसा खाल, विकाल तर शिक्षा; इथं पूर्णपणे Samosa Ban कारण… मॅक्लॉडगंज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला या ठिकाणापासून10 किमी अंतरावर मॅक्लॉडगंज हे ठिकाण आहे. हे ठिकाण तुम्हाला बौद्ध संस्कृतीचा (Buddhist culture) अनुभव घेऊ देतं. तिथे तुम्ही हॉस्टेल, हॉटेल्स किंवा टेंटमध्ये राहू शकता. नाइट लाइफचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ट्रायंडला ट्रेक करू शकता आणि टेकडीवर रात्र घालवू शकता. स्वतःचा टेंट आणि खाण्याचे पदार्थ घेऊन गेल्यास ट्रेकिंगचा खर्च फार कमी आहे. ऋषिकेश ऋषिकेश हे कॅफे, मंदिरं, योग आश्रम आणि घाटांचं घर आहे, असं म्हटलं जातं. या सर्व गोष्टी इथं अगदी कमी खर्चांत उपलब्ध आहे. दररोज 500 ते 700 रुपये खर्च करून तुम्ही ऋषिकेशमध्ये तुमच्या मुक्कामाची सोय करू शकता. तुम्ही निवासासाठी स्वस्त हॉटेल्सचे पर्यायदेखील निवडू शकता. तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही (water sports) आनंद घेऊ शकता. तर, ही आहेत भारतातली पाच सुंदर आणि बजेट फ्रेंडली ठिकाणं. तुमचा काही प्लॅन ठरत नसेल तर या पाचपैकी एक ठिकाण ठरवा आणि मस्तपैकी फिरून या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







