नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशात फेस्टिव्ह सीजनची सुरुवात झाली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या अनेक ई-कॉमर्स साईट्सवर सेल सुरू आहेत. अनेक ऑफर्स आणि डिस्काउंटदरम्यान ग्राहकांना विषेश सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. यासाठी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 अर्थात कंज्यूमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 (Consumer Protection Act 2019) ग्राहकांना काही अधिकार प्रदान करते. बाजारात सामान खरेदी करताना कॅरी बॅगसाठी (Carry Bag) चार्ज भरावा लागला असल्यास ही बातमी महत्त्वाची आहे.
कॅरी बॅगसाठी पैसे घेतल्यास दंड -
नुकतंच, ग्राहक मंच अर्थात कंज्यूमर फोरमने (consumer forum) बिग बाजारवर (Big Bazaar) दंड आकारला आहे. ग्राहकाला कॅरी बॅगसाठी पैसे आकारल्यामुळे, कंज्यूमर फोरमने दंड केला आहे. कंज्यूमर फोरमने, बिग बाजारला 10000 रुपये कंज्यूमर लीगल अँड अकाउंटमध्ये जमा करण्यास सांगितले. त्याशिवाय, तक्रारदाराला 500 रुपये केस खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासासाठी 1000 रुपये आणि कॅरी बॅगसाठी घेण्यात आलेले 18 रुपये परत करण्याचं सांगितलं आहे.
नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद -
सरकारने देशातील ग्राहकांना आजपासून काही अधिकार दिले आहेत. संपूर्ण देशात ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू आहे. या कायद्यांतर्गत दुकानदारांवर लगाम लावण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार, दुकानदाराने पिशवीसाठी पैसे आकारल्यास, ग्राहकाला याची तक्रार करून, त्यावर कारवाई करता येणार आहे. नव्या कायद्यानुसार, कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणं दंडनीय असणार आहे.
येथे करता येणार दुकानदाराची तक्रार -
ग्राहकाने सामान खरेदी केल्यानंतर, दुकानदाराने पिवशीसाठी एक्स्ट्रा पैशांची मागणी केल्यास, आता पैसे द्यावे लागणार नाहीत. तसंच ग्राहक हातात सामान घेऊन जाण्यास सक्षम नसल्यास, दुकानदाराला पिशवी द्यावी लागेल. याबाबत ग्राहक मंचाकडे अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारीनंतर आता ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारल्यास दुकानदारावर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. आता या नव्या कायद्यात कठोर तरतूदी करण्यात आल्या आहेत.
कॅरी बॅगच्या नावाने 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये आकारले गेल्यास, त्यासाठी दंडाची तरतूद आहे. नव्या कायद्यामुळे ग्राहकाकडे विषेश अधिकार असतील. ग्राहकांना देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याचा अधिकार असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.