नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांची (Petrol Pump) संख्या वाढावी, तसेच या भागात पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध व्हावे, यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, देशातील पेट्रोलियम मार्केटिंग उद्योगात लवकरच 6 नव्या खासगी कंपन्या (Private Companies) उतरण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालानुसार, या नव्या 6 कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीकरिता सरकारकडून (Government) परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना इंधनाशी संबंधित अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच यामुळे इंधन विक्रीत स्पर्धादेखील निर्माण होणार आहे. ज्या कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीकरिता परवानगी मिळण्याची शक्यता आहे, त्या यादीत आयएमसी (IMC), ऑनसाइट एनर्जी, आसाम गॅस कंपनी, एमके अॅग्रोटेक, आरबीएमएल सोल्यूशन्स इंडिया, मानस ॲग्रो इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरिंग यांचा समावेश आहे. या कंपन्यांना परवानगी मिळाल्यास या क्षेत्रातील कंपन्यांची एकूण संख्या 14 वर पोहोचेल. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.
हे वाचा-खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी?
ग्राहकांना होणार फायदा
पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये जास्त कंपन्या दाखल झाल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. कारण तुलनेत पेट्रोल पंपांची संख्या वाढणार असून, सेवादेखील पूर्वीपेक्षा अधिक चांगली मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते, 2019 मधील सुधारित बाजार वाहतूक इंधन नियमांच्या आधारावर खासगी कंपन्यांना पेट्रोल उत्पादने म्हणजेच इंधन विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार, ज्या कंपन्यांचं किमान नेटवर्थ 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्याच कंपन्यांना नवीन परवाने दिले जाणार आहेत.
काय असणार मार्गदर्शक सूचना?
कंपन्यांना यासाठी 2000 कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. या पूर्वी तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार परवाना मिळल्यानंतर 5 वर्षांच्या आत संबंधित कंपन्यांना किमान 100 पेट्रोल पंप सुरु करावे लागतील. यापैकी 5 टक्के पेट्रोल पंप हे ग्रामीण भागात सुरू करणे अनिवार्य आहे.
हे वाचा-महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं
आतापर्यंत इंधन मार्केटिंग क्षेत्रात केवळ सरकारी कंपन्याच कार्यरत होत्या. देशातील 90 टक्के पेट्रोल पंपांवर सरकारचे नियंत्रण आहे. उर्वरित 10 टक्के पेट्रोल पंप हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, शेल (Shell) आणि नायरा एनर्जीचे आहेत. ग्रामीण भागात पेट्रोल पंपांची संख्या वाढावी, हा नव्या कंपन्यांना या क्षेत्रात आणण्यामागे सरकारचा उद्देश आहे.
कोणत्या कंपन्यांचे देशात आहेत किती पेट्रोल पंप?
आयओसी (IOC) – 32,062, बीपीसीएल (BPCL) – 18,637, एचपीसीएल (HPCL)-18,634, आरआयएल (RIL) – 1420, एनईएल (NEL) – 6059, शेल – 264, अन्य -18. पेट्रोल पंपाची एकूण संख्या – 77094.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.