नवी दिल्ली, 21 जून : वर्षात असे काही महिने असतात जेव्हा अनेक बदल घडतात. मग तो मार्च असो वा जानेवारी. येत्या महिन्यात म्हणजे जुलैमध्येही असेच बदल होणार आहेत. हे सर्व बदल सर्वसामान्या नागरिकांसाठी फार महत्वाचे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. 10 दिवसांनंतर जुलै महिना सुरू होणार असून घरगुती गॅसच्या दरात
(Gas Price) बदल होईल. आधार आणि पॅन कार्ड लिंक
(Pan card Link) न करणाऱ्यांना दंड आकारला जाईल. चला असे कोणते नियम 10 दिवसांनंतर बदलणार आहेत, त्याची माहिती घेऊ.
पॅन आधार लिंक
तुम्ही अजून तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर सावध व्हा. तुमच्याकडे 10 दिवस आहेत. आधार पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. यानंतर ज्यांचे आधार पॅन लिंक नसेल त्यांना दंड आकारला जाईल. 30 जूनपूर्वी हे काम करून घेतल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. जुलैपासून दंडाची रक्कम 1000 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
डीमॅट खात्याचे KYC
तुम्हीही शेअर्सची खरेदी-विक्री करत असाल आणि तुमचे डिमॅट खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचे ट्रेडिंग खाते केवायसी 30 जूनपर्यंत पूर्ण करा अन्यथा तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाऊ शकते. मग तुम्ही शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही.
इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना?
क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 30 टक्के करानंतर आणखी एक झटका बसणार आहे. आता क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 1 टक्के टीडीएस भरावा लागेल. तुमचा नफा असो वा तोटा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला टीडीएस भरावा लागणार.
स्वयंपाकाच्या गॅसची किंमत
नवीन महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जुलै रोजी एलपीजी गॅसच्या किमतीही वाढू शकतात. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात. त्यामुळे पुन्हा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीतील मालमत्तेवर कर सूट
ही माहिती दिल्लीकरांसाठी आहे. दिल्लीत तुम्ही 30 जूनपर्यंत मालमत्ता कर जमा केल्यास तुम्हाला 15 टक्के सूट मिळेल. ही सवलत 30 जूननंतर मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.