नवी दिल्ली 04 जून : सध्याच्या काळात ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवांना चांगली मागणी आहे. धकाधकीच्या लाइफस्टाईलमुळे (Lifestyle) आजकाल अनेकजण बाहेरून जेवण मागवण्याला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीमध्ये झोमॅटो, फूड पांडा, उबर इट्स आणि स्विगीसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. शिवाय त्यांच्यामध्ये स्पर्धादेखील आहे. जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या नवनवीन योजना तयार करत आहेत. ऑनलाईन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) कंपनी असलेल्या स्विगीनं (Swiggy) आता आपल्या ग्राहकांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्राहकांना स्विगी वन या योजनेचा सदस्य व्हावं लागणार आहे. स्विगी वन (Swiggy One) सदस्यत्वासह ग्राहकांना अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. फूड अॅग्रीगेटर अॅपने अलीकडेच घोषणा केली आहे की स्विगी वन वापरकर्ते आता कोणतेही डिलिव्हरी शुल्क (Delivery Charges) न भरता कोणत्याही रेस्टॉरंटमधून जेवण मागवू शकतील. आतापर्यंत स्विगी वन सदस्यत्वाअंतर्गत फक्त निवडक रेस्टॉरंटमधूनच मोफत फूड डिलिव्हरी दिली जात होती. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महागाई कंबरडं मोडणार; आता कपडे खरेदी करणेही महाग होणार, काय आहे कारण? स्विगीने एका निवेदनात म्हटलं आहे की, तुम्ही ज्या रेस्टॉरंटमधून (Restaurant) जेवण ऑर्डर करत आहात ते डिलिव्हरीसाठी तुम्ही ऑर्डर केलेल्या ठिकाणाच्या 10 किलोमीटरच्या परिघात असलं पाहिजे. तसंच ऑर्डर किमान 149 रुपयांची असावी. याचा अर्थ जरी तुम्ही 10 किलोमीटरच्या परिघात असाल; पण तुमची ऑर्डर 149 रुपये नसेल तर तुम्हाला डिलिव्हरी फी भरावी लागेल. पूर्वी किमान ऑर्डर मूल्य 199 रुपये होतं. स्विगी वनचे फायदे त्याच्या हायपरलोकल इन्स्टामार्ट (Instamart) सेवेवरदेखील लागू होतात. या सेवेमध्ये किराणा सामान आणि घरगुती वस्तू 10 मिनिटांत घरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. इन्स्टामार्ट ऑर्डरिंगच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, फळं आणि भाज्या, लहान मुलांची उत्पादनं, वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू आणि एक हजारांहून अधिक लोकप्रिय उत्पादनांचा समावेश आहे. याशिवाय, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ सेवेच्या स्विगी जिनीवर (Swiggy Ginny) आकारल्या जात असलेल्या 35 रुपयांच्या डिलिव्हरी फीवर अतिरिक्त 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. परंतु, ही सवलत फक्त स्विगी वन वापरकर्त्यांसाठीच आहे. अतिरिक्त स्विगी वन बेनिफिट ही सेवा आता सर्व सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्विगी वन सदस्यत्वासाठी पात्र असलेल्या सर्व वापरकर्त्यांना हा लाभ उपलब्ध करून दिला जाईल. कोणत्याही उच्च मर्यादेशिवाय नियमित ऑफर व्यतिरिक्त अतिरिक्त 30 टक्के सूट ग्राहकांना मिळेल. तसेच 99 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरसाठी अमर्यादित मोफत डिलिव्हरी दिली जाईल. स्विगी वन सदस्यत्व (Swiggy One Membership) योजना 49 रुपयांपासून सुरू होते. परंतु, तुम्ही चाचणीसाठी 15 ते 30 दिवसांसाठीदेखील हे वापरून बघू शकता. दीर्घकालीन सदस्यत्वाची किंमत तीन महिन्यांसाठी 299 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 899 रुपये आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी महिलेनं सुरू केला ‘हा’ व्यवसाय; आता दरमहा मिळतात 2 लाख रुपये स्विगीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, महसूल आणि विकास अधिकारी (Revenue and Development Officer) अनुज राठी म्हणाले, “2021 मध्ये स्विगी वन लाँच झाल्यापासून, आम्ही आमच्या ग्राहकांना अधिकाधिक फायदे देण्याचे मार्ग शोधत आहोत. आम्ही आता वापरकर्त्यांना जवळपासच्या सर्व रेस्टॉरंटमधून अमर्यादित मोफत डिलिव्हरी देण्यासाठी स्विगी वन सेवेचा विस्तार केला आहे. तसेच, स्विगी इन्स्टामार्टवरील बचत देखील वाढवता येऊ शकते. जसजसे आम्ही आमच्या ऑफर वाढवत आहोत, तसतसे आम्ही स्विगी वन ऑफर करत असलेल्या अनन्य सेवांमध्ये वाढ करत राहू आणि गेम चेंजर बनण्याचा प्रयत्न करू.” स्विगीने नवीन योजना आणून अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.