नवी दिल्ली, 13 जुलै : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पास होणं हे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं. त्यासाठी ते अहोरात्र अभ्यास करतात. कारण, यूपीएससी ही जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी मिळाल्यानंतर आयुष्यभरासाठी आर्थिक स्थिरता तर मिळतेच शिवाय समाजात आदर देखील मिळतो. असं असूनही काही आयएएस अधिकारी ही नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतात. अशाच धाडसी अधिकाऱ्यांमध्ये रोमन सैनी यांचा समावेश होतो. बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. सध्या ते हजारो कोटी रुपये मूल्य असलेल्या ‘अनअॅकॅडमी’ या एड-टेक स्टार्टअप्सचे मालक आहेत. ‘झी न्यूज’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अनअॅकॅडमीचे सह-संस्थापक असलेले रोमन सैनी डॉक्टर देखील आहेत. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसची (AIIMS) परीक्षा उत्तीर्ण केली होती. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल ड्रग डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर (एनडीडीटीसी) येथे काम करण्यास सुरुवात केली. त्यांना डॉक्टर म्हणून अवघ्या सहा महिन्यांचा अनुभव होता. पण, ते आपल्या कर्तृत्वाबाबत समाधानी नव्हते त्यांनी स्वत: साठी एक नवीन ध्येय ठेवलं आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. वयाच्या 22व्या वर्षी उत्तीर्ण होऊन ते आयएएस अधिकारी बनले. Success Story: घर गहाण ठेवलं, फॉर्च्युनर विकून सुरू केलं स्टार्टअप; दोनदा अपयशी झाल्यानंतर उभारली कोट्यवधींची कंपनी रोमन सैनी यांनी मध्य प्रदेश केडरमध्ये जिल्हाधिकारी पद भूषवलं. या ठिकाणीही फार काळ त्यांचं मन रमलं नाही. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मित्र गौरव मुंजाल आणि हेमेश सिंह यांच्यासोबत अनअॅकॅडमीची स्थापना केली. ही वेबसाइट हजारो यूपीएससी परीक्षार्थींना मदत करते. विद्यार्थ्यांना माफत किमतीत कोचिंग मिळावं हा त्यांचा उद्देश आहे. अनेक माध्यमांच्या अंदाजानुसार अनअॅकॅडमी कंपनीचं मूल्य सध्या 26 हजार कोटी रुपये आहे. कंपनीनं अवघ्या सहा वर्षांत सुमारे 18 हजार शिक्षक आपल्यासोबत जोडले आहेत. 2022 मध्ये, कंपनीचे सीईओ म्हणून, गौरव मुंजाल यांना 1.58 कोटी रुपये मिळाले. तर, हेमेश सिंग यांना 1.19 कोटी आणि रोमन सैनी यांना 88 लाख रुपये पगार मिळाला. बेंगळुरू येथे सुरू झालेली ही कंपनी यूपीएससी कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांसाठी माफक दरात विविध ऑनलाइन कोर्स तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात फक्त यूपीएससीचं कोचिंग देणाऱ्या अनअॅकॅडमीनं आता वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि शैक्षणिक क्षेत्राचंही मार्गदर्शन सुरू केलं आहे. Success Story: वडील केंद्रात मंत्री आणि मुलाने सुरू केली स्टार्टअप कंपनी, पाहा ‘हा’ कोणत्या नेत्याचा मुलगा चिकाटीनं प्रयत्न केल्यास काहीही अशक्य नाही हे रोमन सैनी यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी एकाच वेळी तीन कठीण गोष्टी पार केल्या. असाधारण कामगिरी करून त्यांनी हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. या कामात त्यांना कुटुंबियांचाही पाठिंबा मिळाला. रोमन सैनी यांची आई गृहिणी आहे तर त्यांचे वडील राजस्थानमध्ये इंजिनीअर आहेत. त्यांची बहीण आयुषी सैनी ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे तर भाऊ आवेश सैनी हे बालरोगतज्ज्ञ आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.