मुंबई, 12 नोव्हेंबर: अमेरिकेसह युरोपातले देश सध्या वाढती महागाई आणि आर्थिक मंदीच्या शक्यतेमुळे चिंतेत आहेत. या दोन्ही गोष्टींचा परिणाम तिथल्या आणि भारतातल्या शेअर बाजारावरही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर काहीसा कमी झाला आहे. महागाई कमी होण्याचे संकेत दिसताच गुरुवारी (10 नोव्हेंबर) अमेरिकी बाजारात जोरदार तेजी दिसून आली आहे. अमेरिकेतल्या या सकारात्मक गोष्टींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. शुक्रवारी (11 नोव्हेंबर) बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. त्यामुळे अमेरिकी बाजारातल्या सकारात्मक घडामोडी भारतीय बाजारावर चांगला परिणाम करत असल्याचं दिसून आलं. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महागाई कमी होण्याच्या संकेतांमुळे गुरुवारी अमेरिकी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. 30 कंपन्या असलेल्या अमेरिकी इंडेक्स डाऊ जोन्समध्ये तीन टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या नॅस्डॅकमध्ये 6 टक्के, तर एस अँड पीमध्ये चार टक्के वाढ पाहायला मिळाली. अमेरिकी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेतल्या या सकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळत आहे. अमेरिकेत ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर 7.7 टक्क्यांवर आला. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हा दर 8.2 टक्के होता. चलनवाढ अनेक वर्षांच्या उच्च पातळीवर पोहोचल्याने अमेरिकेच्या केंद्रीय बॅंकेला व्याजदर आक्रमकपणे वाढवावे लागत आहेत. आता महागाईचा दर घटल्याने अमेरिकन सेंट्रल बॅंक आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा वेग काहीसा कमी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हेही वाचा: क्रूड ऑइलच्या किमतीत वाढ; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? तपासा आजचे दर अमेरिकेतल्या वाढलेल्या व्याजदराचा थेट परिणाम भारतावर होतो. येत्या काळात अमेरिकेत व्याजदर वाढीचा वेग कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतावर दिसू शकतो. यामुळे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकतात. यामुळे देशांतर्गत बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ कमी होईल. `एफआयआय` भारतातून बाहेर पडण्यावर ब्रेक लावू शकतो आणि त्यामुळे बाजारातली घसरण थांबू शकते. अमेरिकी फेडने व्याजदरात सातत्याने वाढ केल्याने भारताची केंद्रीय बॅंक अर्थात आरबीआयवर व्याजदर वाढवण्याचा दबाव वाढत आहे. यामुळे रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिकी फेडने यावर ब्रेक लावला तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियादेखील रेपो रेट वाढवण्याचा वेग कमी करू शकते. तथापि, भारतातल्या किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बॅंकेच्या निश्चित आकड्यापेक्षा जास्त आहे. https://lokmat.news18.com/web-stories/technology/top-online-shopping-websites-in-india/index.html अमेरिकेत ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी झाल्याने तिथल्या बाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारी (10 नोव्हेंबर) कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात मोठी विक्री झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा घटला होता, तर निफ्टी 18050 च्याही खाली आला; पण शुक्रवारी जागतिक संकेत सकारात्मक दिसू लागल्याने भारतीय बाजारात उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या चिन्ह्यावर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 827.54 अंक म्हणजेच 1.37 टक्क्यांनी वाढून 61441.24 वर, तर निफ्टी 241.00 अंक अर्थात 1.34 टक्क्यांनी वाढून 18269.20 वर पोहोचल्याचं दिसून आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.