• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • NSDL च्या विधानानंतरही अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण सुरूच

NSDL च्या विधानानंतरही अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण सुरूच

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. मंगळवारी शेअर बाजारात या शेअर्समध्ये थोडीफार उलाढाल झाली, पण त्यात फार वाढ झाली नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 जून : अदानी समूहात (Adani Group) गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती गोठवली नसल्याचा खुलासा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात एनएसडीएलने (National Securities Depository Ltd) (NSDL) केल्यानंतरही आज मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समधील (Shares) घसरण फारशी थांबली नाही. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात होताच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. काल समूहाच्या सहा पैकी पाच कंपन्यांचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी खाली आले. यामुळे आशियातील आणि देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योजक आणि अदानी समूहाचे प्रवर्तक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या उद्योग समूहाचं अवघ्या एका तासात तब्बल 73 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. या समूहाचं भांडवली बाजारातील बाजारमूल्य काल 15 अब्ज डॉलर्सनी कमी झालं होतं. एनएसडीएलने अदानी समूहात तब्बल 43 हजार 500 कोटींची गुंतवणूक असणाऱ्या अब्दुल्ला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रिस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांची खाती गोठवली. तसंच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्टअंतर्गत बेनीफिशियल ऑफ ओनरशिपची (Beneficial Of Ownership) म्हणजेच या कंपन्यांच्या मालकीविषयीची माहिती देणं अत्यावश्यक आहे, मात्र त्यात पुरेशी पारदर्शकता नसल्याने एनएसडीएलनं ही कारवाई केली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटल्याची अफवा पसरली होती. या तीन कंपन्यांनी एकत्रितरित्या अदानी एंटरप्राईझेसमध्ये 6.82 टक्के शेअर्स, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींनी काल नीचांक गाठला.

(वाचा - अदानी समूहाला मोठा फटका, अवघ्या तासाभरात शेअर बाजारात 73 हजार कोटींचं नुकसान)

मंगळवारी शेअर बाजारात या शेअर्समध्ये थोडीफार उलाढाल झाली, पण त्यात फार वाढ झाली नाही. सकाळी साडे दहाच्या सुमारास नोंदवण्यात आलेल्या किमतीनुसार अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये अर्धा टक्का खालच्या भावावरच उलाढाल होत होती, तर अदानी पॉवरच्या शेअर्सच्या किमतीत पाच टक्के घसरणच दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये मात्र 2 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. हा शेअर 1496.85 रुपये किमतीवर होता. यात 0.29 टक्के घसरण झाली होती. अदानी पॉवरच्या शेअर्सचा भाव 133 वर होता, त्यात 4.97 टक्के घसरण होती. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 1441.40 वर, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 0.08 टक्के घसरणीसह 1175 वर, अदानी टोटल गॅसचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 1467.35 वर, तर अदानी पोर्ट्सचा शेअर 0.72 टक्के घसरणीसह 763.15 वर व्यापार करत होता.
Published by:Karishma Bhurke
First published: