नवी दिल्ली, 15 जानेवारी : शेअर बाजार (stock market) तेजीत असतो, तेव्हा अनेक गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण होते. गुंतवणूकदारांना वाटते की, बाजारात कधीही पडझड होऊ शकते. त्यामुळे अनेकजण शेअर बाजारात तेजी असतानाच त्यांच्याकडे असणाऱ्या शेअर्सची विक्री करून नफा (profit) कमवण्यावर विश्वास ठेवतात. पण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून असं करणं योग्य आहे का? प्रसिद्ध गुंतवणूकदार हॉवर्ड मार्क्सच्या (Howard Marks) दृष्टीने ही एक मोठी चूक आहे. 'इक्विटी गुंतवणूकदारांचा (equity investor) निर्णय जर भीतीवर आधारित असेल, तर तो निश्चितच चुकीचा निर्णय असेल,' असं मार्क्सचं म्हणणं आहे. ते म्हणतात, 'गुंतवणुकीत भीती आणि मानसशास्त्रीय गृहितकांना स्थान नाही.' शेअर बाजार तेजीत असताना गुंतवणुकीबाबत कोणता निर्णय घ्याव्या, याबाबत हॉवर्ड मार्क्स यांनी काही टिप्स (Howard Marks Investment tips) सांगितल्या आहेत.
बाजार तेजीत असताना शेअर्स विकणं चुकीचं
शेअर बाजार तेजीत असताना अनेक गुंतवणूकदार शेअर्स विकण्याची चूक करतात असे मार्क्स सांगतात. 'गुंतवणूकदारांना असे वाटते की, आता बाजारात पडझड अपरिहार्य आहे, त्यामुळेच ते त्यांच्याकडील स्टॉकची विक्री करून भविष्यातील नुकसान टाळत आहेत. प्रत्यक्षात मात्र अशावेळी एकतर शेअर्स विकत घेतले पाहिजेत, किंवा होल्ड केले पाहिजेत. कारण अनेकदा असे दिसून आले आहे की, जेव्हा शेअर बाजार वर जात असतो, याचा अर्थ तो पुढेही वरच जाणार आहे. त्यामुळेच गुंतवणूकदाराने दीर्घ मुदतीत मिळणार्या रिटर्नवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.' मार्क्स यांच्या मते, 'गुंतवणुकीचा अर्थ भांडवलाचे संपत्तीमध्ये दीर्घकालीन रूपांतर करून स्टॉकच्या संभाव्यतेचे अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मूल्यांकन करणे.'
शेअर बाजार तेजीत असताना शेअर्स विकून नफा कमवणं (profit taking) अनेकांना चांगलं वाटतं. प्रत्यक्षात ते चांगले धोरण नाही. मार्क्स म्हणतात, 'नफा कमवल्याने कधीच कोणाला नुकसान होत नाही, ही धारणा अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे, परंतु व्यावसायिक दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी (professional investor) ती अंगीकारणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. त्यामुळे बाजारात तेजी असेल, तुम्हाला चांगला रिटर्न मिळत असला तरी तुम्ही शेअर्स विकून नफा कमवण्याऐवजी त्याची विक्री करू नये. याचा तुम्हाला दीर्घकाळात खूप फायदा होईल.'
भीतीने शेअर्स विकणं धोकादायक
मार्क्स यांच्या मते, 'शेअर्सची विक्री करण्यासाठी अनेक चांगली कारणे असू शकतात. पण जर तुम्ही चुकून किंवा नुकसान होण्याच्या भीतीने शेअर्सची विक्री करत असाल, तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. विक्रीचा निर्णय (selling decision) योग्य आर्थिक विश्लेषण, दृढ निश्चय आणि गुंतवणुकीच्या शिस्तीने बनलेल्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनावर आधारित असावा. हा निर्णय कधीही गुंतवणूकदाराच्या मानसशास्त्रावर (psychology) आधारित असू शकत नाही.'
इतरांच्या चुकांमुळे होईल फायदा
'इतरांच्या चुका पाहून गुंतवणुकीचे यशस्वी निर्णय घेतले जातात,' असेही मार्क्स म्हणतात. 'जर कोणी भीतीपोटी शेअर्स विकत असेल, तर त्याची ही चूक खऱ्या गुंतवणूकदाराला खरेदीची उत्तम संधी देत असते. अशावेळी त्याने फायदा घ्यावा.' मार्केट गुरू यांच्या मते, 'गुंतवणुकीच्या निर्णयाचा आधार हा कोणत्याही मालमत्तेच्या क्षमतेचे योग्य मूल्यांकन आहे. केवळ बाजारात तेजी आली आहे, आणि आता पडझड होईल, या आधारावर हा निर्णय घेता येणार नाही.'
पोर्टफोलिओमध्ये त्वरित फेरफार अयोग्य
हॉवर्ड मार्क्सच्या मते, 'जर एखाद्या गुंतवणूकदाराने बदलत्या बाजार परिस्थितीनुसार त्याच्या पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल केले, तर तो अपेक्षित कमाई करू शकत नाही. बाजारात तेजी असताना शेअर्स विकणे, नंतर पुन्हा खरेदी करणे आणि विक्री करणे ही पूर्णपणे चुकीची रणनीती आहे. त्यामुळे जेव्हा बाजारात तेजी असते, तेव्हा दीर्घकालीन विचार करून निर्णय घ्या.'
शेअर बाजारात तेजी आल्यानंतर अनेकदा गुंतवणूकदार घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. अशावेळी कोणतीही गडबड न करता शांततेत दीर्घकालीन फायद्याचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.