मुंबई, 20 सप्टेंबर : हल्ली शेअर बाजारातील गुंतवणुकीचं प्रमाण वाढलंय. अनेक जण शेअर्सची खरेदी आणि विक्री करत असतात. परंतु, आता शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदारांच्या हितासाठी मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) मोठं पाऊल उचललं आहे. सेबीने गुंतवणूकदारांच्या शेअर्सचं संरक्षण करण्यासाठी नवीन नियम जारी केला आहे. सेबीने शेअर्सचे पे-इन तपासण्यासाठी एक सर्क्युलर प्रसिद्ध केलं आहे. या अंतर्गत, आता डिपॉझिटरी क्लायंटचे शेअर्स ब्रोकरच्या खात्यात तेव्हाच ट्रान्सफर होतील, जेव्हा ते क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि क्लायंटने दिलेल्या सूचनांशी जुळत असतील. सेबीचं सर्क्युलर 25 नोव्हेंबर 22 पासून लागू केलं जाईल. झी बिझनेसने या संदर्भात वृत्त दिलंय. सर्क्युलरमधील माहितीनुसार, आता क्लायंटच्या नेट डिलिव्हरी ऑब्लिगेशनशी जुळल्यानंतरच शेअर्स ट्रान्सफर केले जातील. त्यासाठी क्लायंटने स्वतः सूचना दिली आहे का, किंवा त्याच्या वतीने दिलेली पॉवर ऑफ अॅटर्नी असलेल्या व्यक्तीने सूचना दिली आहे का, किंवा डिमॅट डेबिट/प्लेज सूचना आहे का, हे तपासलं जाईल. नंतर ते क्लिअरिंग कॉर्पोरेशनने दिलेल्या डिलिव्हरी ऑब्लिगेशनशी पडताळले जातील. त्यानंतरच क्लायंटच्या खात्यातील शेअर्स ट्रेडिंग मेंबरच्या पूल अकाउंटमध्ये जातील. यूनिक क्लायंट कोडशी होणार पडताळणी शेअर्स एकदा क्लायंटच्या खात्यातून ट्रेडिंग मेंबरच्या पूल खात्यात ट्रान्सफर झाल्यानंतर, युनिक क्लायंट कोड, ट्रेडिंग आणि क्लिअरिंग मेंबरचा आयडी, शेअर्सची संख्या आणि सेटलमेंट तपशीलांची पडताळणी केली जाईल. यामध्ये साम्य न आढळल्यास ते डील कॅन्सल होईल. जर इन्स्ट्रक्शन्स आणि ऑब्लिगेशन यांचा मेळ नसेल, तर त्यावरही नियम स्पष्ट करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जिथे इन्स्ट्रक्शन्स कमी आणि ऑब्लिगेशन जास्त असेल, तिथे कमी इन्स्ट्रक्शन्स असल्याची बाब गृहित धरली जाईल. वाचा - भारीच! आता टर्म पॉलिसी बंद केल्यावर प्रीमियम मिळेल परत, वाचा आश्चर्यकारक फायदे सेबीच्या सर्क्युलरमधील महत्त्वाच्या गोष्टी गुंतवणूकदारांच्या शेअर्सचं संरक्षण करण्यासाठी सेबीचा नवा नियम आहे. सिक्युरिटीजच्या पे-इन तपासणीसाठी यंत्रणा मजबूत केली जाईल. डिपॉझिटरी क्लिअरिंगशी पडताळणी केल्यानंतरच शेअर ट्रान्सफर करता येतील. क्लायंटच्या नेट डिलिव्हरी ऑब्लिगेशनशी पडताळणी केल्यानंतर ट्रान्सफर होईल. इन्स्ट्रक्शन स्वतः क्लायंटने दिली आहे, की नाही याची पडताळणी केली जाणार. पॉवर ऑफ अॅटर्नी किंवा DDPI च्या माध्यमातूनही करता येणार पडताळणी. अर्ली पे-इनसाठी सध्याची ब्लॉक व्यवस्था चालू राहील. UCC, TM, CM ID, ISIN, संख्या जुळवून पाहिल्यानंतर ट्रान्सफर होणार. इन्स्ट्रक्शन-ऑब्लिगेशन न जुळल्यास वेगळा नियम. संख्या न जुळल्यास फक्त कमी इन्स्ट्रक्शन्स मान्य होणार. अशा रितीने सेबीने ग्राहकांच्या शेअर्सच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.