नवी दिल्ली, 16 जुलै: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India SBI) त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना महत्त्वाची सूचना जारी (SBI Important Notice) केली आहे. बँकेने ही महत्त्वाची सूचना दिली आहे जेणेकरुन ग्राहकांचा कोणताही खोळंबा होणार नाही, आणि वेळेत त्यांना त्यांची आवश्यक कामं पूर्ण करता येतील. SBI ने ट्वीट करत माहिती दिली आहे की बँक आज आणि उद्या काही सेवा बंद ठेवणार आहे. एसबीआयने ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, सिस्टम मेंटेनन्ससाठी 16 आणि 17 जुलै रोजी काही सेवा बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि UPI या सेवांचा समावेश आहे. एसबीआयने ट्वीट करत म्हटलं आहे की या सेवा 16 जुलै रोजी रात्री 10.45 ते 17 जुलै रोजी रात्री 01.15 वाजेपर्यंत या सेवा बंद राहणार आहेत. जवळपास 150 मिनिटांसाठी या सेवा बंद असतील. एसबीआयने यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी एसबीआयकडून ठराविक कालावधीनंतर मेंटेनन्स आणि अपग्रेडेशन केलं जातं. याच पार्श्वभूमीवर या काही सेवा आज आणि उद्या बंद असणार आहेत. या दरम्यान यूपीआय ट्रान्झॅक्शन बंद राहतील. ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी अशाप्रकारे अपग्रेडेशन करण्यात येते आहे. याआधीही अनेकदा बँकेने सेवा बंद ठेवल्या होत्या.