देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे ग्राहकांसाठी खास गिफ्ट, कर्जावरील EMI झाला कमी
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank)कर्जावरील दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 11 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या एचडीएफसी (HDFC) बँकेने ग्राहकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने बेस रेट 0.55 टक्के कमी करत 7.55 टक्के केला आहे. हे दर 11 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या घोषणेनंतर बेस रेटवर आधारित कर्ज स्वस्त होतील. बेस रेट म्हणजे असे दर असतात की ज्यापेक्षा कमी दराने बँका कर्ज देऊ शकत नाहीत. या दराला कर्जाचे कमीत कमी व्याजदर म्हटले जाते.
बँकेच्या या निर्णयानंतर बेस रेटवर आधारीत कर्जावरील दर कमी होतील. याचाच अर्थ असा की अशाप्रकारच्या कर्जावरील EMI वर दर महिन्याला 0.55 टक्के बचत होणार आहे.
बेस रेट ही संकल्पना 2010 मध्ये सुरू करण्यात आली होती, जेणेकरुन बँका केवळ कॉर्पोरेट लोकांनाच नव्हे तर किरकोळ कर्जदारांनाही स्वस्त कर्ज देईल. बेस रेट म्हणजे असे दर असतात की ज्यापेक्षा कमी दराने बँका कर्ज देऊ शकत नाहीत. कर्जाचा हा किमान व्याज दर मानला जातो.
परंतु काही बँकांनी या दरासह छेडछाड सुरू केली. 2015 मध्ये आरबीआयने एमसीएलआर सुरू केला, त्या अंतर्गत कर्जाची रक्कम आणि कालावधीनुसार बँका वेगवेगळ्या दराने कर्ज देऊ लागल्या. यानुसार निश्चित मुदतीसाठी व्याजदर ठरवला जातो आणि त्यात नंतर बदल करणे शक्य होते.
याआधी आज सरकारी बँक सेंट्रल बैंक ऑफ इंडियाने (Central Bank of India) कर्जावरील प्रमुख व्याजदर असणाऱ्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्याने कपात केली आहे. सर्व कालावधीच्या कर्जासाठी हे रेट्स असतील. या बँकेचे नवीन दर मंगळवार 15 सप्टेंबरपासून लागू होत आहेत. बँकेने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी असणारे कर्जावरील MCLR 7.15 टक्क्यावरून 7.10 टक्के केला आहे. तर एक दिवस आणि एका महिन्याच्या अवधीसाठीचा एमसीएलआर 6.55 टक्के करण्यात आला आहे, जो आधी 6.60 टक्के होता. बँकेने 3 महिने आणि सहा महिन्याच्या कर्जावरील ईएमआय अनुक्रमे 6.85 टक्के आणि 7 टक्के केला आहे.