दिल्ली, 29 एप्रिल: पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) खातं असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर नॅशनल पेन्शन योजनेचा (National Pension Scheme) लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही सुविधा आता ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमधून ऑनलाईन नॅशनल पेन्शन योजनेचे सदस्यत्व घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी खाते उघडू शकता.
पोस्ट ऑफिसने आता 26 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने NPS सदस्यत्व देण्यास सुरुवात केली आहे. 18-70 वयोगटातील भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नॅशनल पेन्शन सिस्टम-ऑनलाईन सेवा मेनूला भेट देऊन ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
वाचा - Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया
राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्र सरकारच्या पोस्ट विभागामार्फत (Department of Posts) उपलब्ध करून दिली जाते. ही भारत सरकारची ऐच्छिक पेन्शन योजना आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे या योजनेचं व्यवस्थापन केलं जातं. पोस्ट विभाग 2010 सालापासून त्यांच्या निवडक पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून फिजिकल मोडमध्ये NPS उपलब्ध करून देतो.
NPS म्हणजे काय?
एनपीएस ही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची योजना आहे. नियमांनुसार, वयाच्या 60 वर्षांपूर्वी किंवा निवृत्तीपूर्वी एनपीएसमधून पैसे काढता येत नाहीत. परंतु, काही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही या पेन्शन फंडातून पैसे काढू शकता.
सर्व्हिस चार्ज सर्वांत कमी
NPS ऑनलाईनच्या माध्यमातून, नवीन ग्राहकांची नोंदणी, सुरुवातीचे किंवा त्यानंतरचे योगदान आणि SIP पर्याय यासारख्या सुविधा ग्राहकांना कमीतकमी शुल्कांत उपलब्ध आहेत. आपले एनपीएस सर्व्हिस चार्जेस सर्वांत कमी आहेत, असा पोस्ट विभागाचा दावा आहे.
वाचा- LIC IPO साठी पॉलिसी धारकांना विशेष डिस्काउंट! मिळवण्यासाठी आहेत ‘या’ 5 अटी
अकाउंट उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रं
खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर (Mobile Number), ई-मेल आयडी आणि नेट बँकिंग सुविधेसह सक्रिय बँक खातं असणं आवश्यक आहे.
अर्जदाराने पॅन क्रमांकासह वैयक्तिक पेन्शन खातं उघडण्याचा पर्याय निवडल्यास, PRAN सक्रिय करणं आवश्यक आहे. दरम्यान NPS खात्यात घरबसल्या पैसे जमा करता येतात.
खातं बंद करण्याचा नियम
जर एखाद्या व्यक्तीला एनपीएसमधून पैसे काढायचे असतील तर त्यासाठी काही अटी आहेत. PFRDA नुसार, NPS चा लॉक-इन पीरियड 5 ते 10 वर्षांचा असतो. जर एखाद्याला NPS खातं बंद करायचं असेल तर त्याला खातं उघडल्यापासून 5 वर्षांनी ही सुविधा मिळेल. म्हणजेच NPS खातं 5 वर्षांनंतरच बंद करता येते. स्वयंरोजगार असलेल्या लोकांसाठी हा नियम आहे. जर तुम्ही पगारदार असाल तर तुम्हाला खातं 10 वर्षं चालवावं लागेल. त्यानंतरच तुम्ही खातं बंद करू शकता. याला प्री-मॅच्युअर एक्झिट म्हणतात.
पोस्ट ऑफिसमध्ये नॅशनल पेन्शन स्कीमचा लाभ घेणाऱ्यांसाठी हे काही महत्वाचे नियम आणि अटी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.