नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) कर्जासाठी रेपोशी संबधित व्याजदर (RLLR) सोमवारी 0.15 टक्क्यांनी वाढवून 6.80 टक्के केला आहे. 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. या वाढीनंतर बँकेचा आरएलएलआर 6.65 टक्क्यावरून 6.80 टक्के झाला आहे. गृह, शिक्षण, वाहन, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी घेण्यात येणारे कर्ज इ. सर्व RLLR शी जोडलेले आहेत. त्यामुळे हे दर वाढवल्यामुळे या सर्व प्रकारच्या कर्जावर याचा परिणाम होणार आहे.
गृहकर्ज किंवा वाहन कर्ज घेणे होईल महाग
पीएनबीच्या या निर्णयामुळे गृहकर्ज किंवा वाहन कर्ज महाग होईल. ईएमआयवर देण्यात येणारी सूट वाढवण्यात येणार की नाही याबाबत आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉकडाऊननंतर आरबीआयने तीन महिन्यांसाठी लोन मोरटोरियमची घोषणा केली होती. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांसाठी असणारी ही सवलत त्यानंतर आणखी तीन महिन्यासाठी वाढवण्यात आली होती. याचिकाकर्त्याने कोर्टात अशी याचिका दाखल केली आहे की, कोरोनाच्या संकटकाळात जी परिस्थिती पाहून मोरटोरियमची सूविधा देण्यात आली होती ती परिस्थिती अद्याप संपलेली नाही आहे. त्यामुळे मोरटोरियमची सुविधा डिसेंबर पर्यंत वाढवण्यात यावी.
(हे वाचा-मोठी बातमी! सप्टेंबर महिन्यात LPG घरगुती गॅसचे नवे भाव लागू, वाचा काय आहेत दर)
गेल्या आठवड्याच पीएनबी प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यपालक अधिकारी एस एस मल्लिकार्जुन राव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असे सांगितले होते की, आम्ही जूनपर्यंत 7.21 लाख कोटींचे कर्ज दिले आहे. यामध्ये MSME ला दिलेले कर्ज 1.27 लाख कोटी आहे. यामध्ये 14 टक्के एनपीए आहे. यानुसार आमचा अंदाज आहे की, 5 ते 6 टक्के कर्ज पुनर्गठित करावे लागेल. ही रक्कम साधारण 40,000 कोटी आहे. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जाने पुनर्गठन के व्ही कामत यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर केले जाईल.