नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालादिवशी (Delhi Assembly Election Result 2020) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या आठवड्यात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग दुसऱ्या दिवशी कमी केल्या आहेत. किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव पाच महिन्यातील सर्वात कमी भाव आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव प्रति लीटर 72 रुपयांहून खाली उतरले आहेत तर एक लीटर डिझेलचे दर 65 रुपयांपेक्षा कमी आहेत. यावर्षी पेट्रोल-डिझेलच्या भावात प्रति लीटर 4 रुपयांपेक्षा अधिक दराने कमी झाले आहेत. मुंबईत पेट्रोल 77.60 रुपयांवर पोहोचलं असून डिझेलचे दर 67.98 रुपये इतके आहेत. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 71.94 रुपये प्रति लीटर आहेत, तर डिझेलचे भाव 64.87 प्रति लीटर आहेत. कोलकात्यातील पेट्रोलचे दर 74.58 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 74.73 रुपये इतके आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने घसरण होत आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत आहे. गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत 30 टक्क्यांनी घट झाली होती. चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील विविध व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे.
(हेही वाचा- सोन्याची झळाळी उतरली, मंगळवारचे भाव इथे पाहा)
कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये सुद्धा घट झाली आहे. चीनच्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूच्या आयात कमी झाली आहे. कारण बहुतेक चिनी शुद्धीकरण कंपन्यांनी त्यांच्या कामकाजात लक्षणीय घट केली आहे. भविष्यात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.