मुंबई, 28 जून : केंद्र सरकार लवकरच देशात कामगार सुधारणांसाठी चार नवीन कामगार कायदे (New Labour Code) लागू करू शकते. या संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, पीएफ आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) यासह अनेक गोष्टी बदलतील. ग्रॅच्युइटीसाठी एखाद्या संस्थेत 5 वर्षे सलग काम करण्याचे बंधन काढून टाकून सरकार ते एक वर्ष करू शकते. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
ग्रॅज्युइटी बाबत हा नियम लागू झाल्यास कोणत्याही ठिकाणी वर्षभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने ग्रॅच्युइटीच्या नियमात बदल केल्यास करोडो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे. कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्यास ग्रॅच्युइटी दिली जाते. कर्मचार्यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कापला जातो, परंतु कंपनी मोठा भाग देते.
New Labour Code: नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसात मिळणार फुल अँड फायनलचे पैसे, अजूनही अनेक फायदे
कुणाला ग्रॅच्युइटी मिळते?
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत, हा लाभ 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला उपलब्ध आहे. तसेच संस्थेत सलग पाच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, निवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने नोकरी सोडली, त्याने ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले, तर त्याला लाभ मिळतो.
ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन समजून घेऊ?
कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळणार याचे सूत्र आहे. येथे महिन्यात फक्त 26 दिवस मोजले जातात कारण असे मानले जाते की 4 दिवस सुट्ट्या आहेत. त्याच वेळी, ग्रॅच्युइटीची गणना वर्षातील 15 दिवसांच्या आधारे केली जाते.
एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (अंतिम वेतन) x (15/26) x (कंपनीमध्ये नोकरी केलेली वर्षे)
जर एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत 20 वर्षे काम केले असेल आणि त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 75000 रुपये असेल (मूळ वेतन आणि महागाई भत्त्यासह). तर अशी गणना केली जाईल.
ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (75000) x (15/26) x (20) = 865385 रुपये. अशा प्रकारे, कर्मचाऱ्याला 8,65,385 रुपये ग्रॅच्युइटी म्हणून मिळतील.
नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार?
वर्षे अशी मोजली जातात
5 वर्षांच्या सेवेच्या कालावधीची गणना करताना, हे लक्षात घेतले जाते की जर एखाद्याने 240 दिवसांपेक्षा जास्त काळ सतत काम केले असेल, तर त्याला पूर्ण सेवेचे 1 वर्ष मानले जाईल. त्यामुळे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्षांची सेवा पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली, परंतु तेथे सतत 4 वर्षे आणि 240 दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले असेल, तर तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार असेल आणि त्याचा सेवा कालावधी 5 वर्षे मानला जाईल. त्याचप्रमाणे, ज्या संस्थांमध्ये कर्मचारी आठवड्यातून 6 दिवसांपेक्षा कमी, 4 वर्षे आणि 190 दिवसांपेक्षा जास्त सेवा करतात, अशा संस्थांमध्ये कर्मचारी ग्रॅच्युइटीचा हक्कदार बनतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.