'या' Mutual Fund मध्ये गुंतवलेली रक्कम 5 वर्षांत दुप्पट तर 10 वर्षांत झाली तिप्पट, अजूनही आहे संधी

'या' Mutual Fund मध्ये गुंतवलेली रक्कम 5 वर्षांत दुप्पट तर 10 वर्षांत झाली तिप्पट, अजूनही आहे संधी

गेल्या साडेतीन वर्षांत फार्मास्युटिकल अर्थात औषधनिर्माण क्षेत्रातल्या म्युच्युअल फंड्सची (Mutual Funds) कामगिरी फारशी चांगली नव्हती; मात्र सध्या कोरोनामुळे औषधं आणि लशींच्या निर्मितीला वेग आला आहे. त्यामुळे फार्मा क्षेत्रातल्या (Pharma Sector) फंड्सना चांगले दिवस आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Coronavirus) नागरिकांच्या मनात तर भीती आहेच. शिवाय सर्वच क्षेत्रांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुंतवणूक क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शेअर बाजारही (Share Market) पडला असल्यामुळे ही भीती वाढत आहे. दरम्यान, शेअर बाजारात मंदी असली, तरी Nippon India Pharma या म्युच्युअल फंडाची दमदार कामगिरी या वर्षीही सुरू आहे. गेल्या साडेतीन वर्षांत फार्मास्युटिकल अर्थात औषधनिर्माण क्षेत्रातल्या म्युच्युअल फंड्सची (Mutual Funds) कामगिरी फारशी चांगली नव्हती; मात्र सध्या कोरोनामुळे औषधं आणि लशींच्या निर्मितीला वेग आला आहे. त्यामुळे फार्मा क्षेत्रातल्या (Pharma Sector) फंड्सना चांगले दिवस आले आहेत. या क्षेत्रातील तेजी पुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे गुंतवणुकदारांना नफ्याची आशा आहे.

निप्पॉन इंडिया फार्मा या फंडाची गेल्या वर्षभरातली कामगिरी खूप चांगली आहे. 20 एप्रिल 2020 रोजी कोणी या फंडात 10 हजार रुपये गुंतवले (Investment) असते, तर ती रक्कम आज 15 हजार 474 एवढी झाली असती. म्हणजेच एका वर्षात सुमारे 55 टक्के परतावा (Returns) मिळाला असता. याच प्रकारे तीन वर्षांत 92 टक्के, पाच वर्षांत 104 टक्के आणि 10 वर्षांत 392 टक्के परतावा (Return) मिळू शकतो.

(हे वाचा-फक्त 131 रुपये गुंतवून मिळतील 20 लाख; सरकारची ही योजना माहिती आहे का?)

एखाद्या व्यक्तीने 2004मध्ये हा फंड सुरू झाला, तेव्हा या फंडात 10 हजार रुपये गुंतवणूक केली असती, तर त्याचं मूल्य वाढून आज 2.73 लाख रुपये झालं असतं. म्हणजेच तब्बल 2600 टक्के परतावा मिळाला असता. या फंडात केलेल्या गुंतवणुकीतून एका महिन्यात 13.62 टक्के, सहा महिन्यांत 20.27 टक्के, तर दोन वर्षांत 78.62 टक्के परतावा मिळाला आहे. निप्पॉन लाइफ ही जपानची 130 वर्षं जुनी कंपनी आहे.

परताव्याचं हे चांगलं प्रमाण पुढेही राहील का?

कोरोना काळात औषधनिर्माण क्षेत्रावरचा लोकांचा विश्वास वाढतो आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्या ज्या राज्यांत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे, तिथे बहुतांश कंपन्यांची कामं ठप्प झाली आहेत; मात्र औषधनिर्मिती कंपन्यांची कामं सुरू आहेत. त्यांच्याकडच्या मागणीत खंड पडलेला नाही. शिवाय, सरकारही या कंपन्यांच्या उत्पादननिर्मितीला प्रोत्साहन देत आहे. औषधांची वाढती मागणी आणि त्यामुळे या क्षेत्रात चांगली वाढ होण्याची शक्यता यांमुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, असं तज्ज्ञांना वाटतं.

(हे वाचा-'या' उपाययोजना करा अन्यथा रिकामं होईल खातं; स्टेट बँकेनं ग्राहकांना दिला इशारा)

फार्मा क्षेत्रातल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांकडून गुंतवण्यात आलेले पैसे फंडांकडून फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवले जातात. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) यासाठीचे नियम बनविलेले आहेत. सेक्टर स्कीम्सना त्यांच्याकडच्या पैशांपैकी 80 टक्के गुंतवणूक त्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये करावी लागते. थोडक्यात सांगायचं तर, फार्मा क्षेत्रातल्या फंडांना 80 टक्के रक्कम फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणं बंधनकारक असतं. साधारणतः फार्मा फंड्सना मागणी कमी असते. कारण त्यातून मिळणारा परतावाही कमी असतो; मात्र कोरोना काळात त्या फंडांची कामगिरी उत्तम राहण्याचा अंदाज आहे.

First published: April 23, 2021, 9:47 AM IST
Tags: money

ताज्या बातम्या