नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: गेल्या काही काळापासून आपल्या देशात म्युच्युअल फंडातील (Investment in Mutual Fund) गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवण्याच्या एसआयपीच्या (What is SIP) पर्यायाने यातील गुंतवणुकीला अधिक चालना दिली आहे. कारण हा पर्याय सहज सोयीचा आहे. सप्टेंबर 2021 अखेर म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे 10 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे. म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या चांगल्या परताव्यानेही (Returns in Mutual Fund) लोकांना आकर्षित केलं आहे. काही फंडांनी एका वर्षात 100 टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत. मात्र अनेकदा लोकांना म्युच्युअल फंडात कशा प्रकारे गुंतवणूक करावी हे समजत नाही.
म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. एक म्हणजे कोणत्यातरी गुंतवणूक करून देणाऱ्या मध्यस्थ कंपनी किंवा व्यक्ती म्हणजे एजंटतर्फे पैसे गुंतवता येतात. दुसरा मार्ग म्हणजे थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंडांमध्ये थेट गुंतवणूक कशी करावी याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
वाचा-Axis Bank ची धमाकेदार फेस्टिव्ह ऑफर! होम लोनवर 12 EMI ची सूट तर आणखीही बेनिफिट्स
केवायसी आवश्यक
म्युच्युअल फंडांमध्ये थेट ऑफलाइन (offline investment in mutual fund) किंवा ऑनलाइन (Online investment in mutual fund) गुंतवणूक करता येते. यासाठी तुमचे केवायसी (KYC)पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. ऑनलाइन व्यवहार करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही जवळच्या म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेत जाऊन गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंड योजनांमध्ये थेट गुंतवणूक करण्यासाठी ऑनलाइन मार्ग सर्वात सोपा आहे. यासाठी कमिशनदेखील (No Commission) द्यावे लागत नाही. तुम्ही फंडाच्या वेबसाइटद्वारे किंवा आरटीए साइटद्वारे किंवा फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे (Fintech Platform)ऑनलाइन गुंतवणूक करू शकता.
थेट योजनेत गुंतवणूक
थेट योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवून त्याप्रमाणे योग्य फंडाची निवड करणे. इथे तुमच्या गुंतवणूकीचे नियमितपणे व्यवस्थापन करण्याची आणि गरजेनुसार त्यात बदल करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असते. ज्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाबाबत सखोल माहिती आहे, अशा लोकांसाठी थेट गुंतवणूक योजना उपयुक्त आहे. प्रत्येकाला योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा आणि गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत नसते. त्यामुळे ज्यांना म्युच्युअल फंडाबद्दल कमी माहिती आहे त्यांना एजंटद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
वाचा-दिवाळीच्या काही दिवस आधी महागलं सोनं, वर्षाअखेर चांदी पोहोचणार 82,000 रुपयांवर?
थेट म्युच्युअल फंड गुंतवणूक
अनेक फिनटेक कंपन्या विनामूल्य किंवा शुल्क आकारून थेट म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. यापैकी बहुतांश प्लॅटफॉर्म सेबी (SEBI) कडे नोंदणीकृत आहेत त्यामुळे सेबीने घालून दिलेल्या सुरक्षा आणि गोपनीयतेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे त्यांना अनिवार्य असते. अर्थात आजकाल फॉर्च्यून 500 कंपन्याच्या वेबसाईटही हॅक केल्या जाऊ शकतात तसेच म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मदेखील. मात्र अशी शक्यता अगदी नगण्य आहे.
सुरक्षित गुंतवणूक
सध्या अस्तित्वात असलेले थेट गुंतवणूक प्लॅटफॉर्म स्टार्टअप्सच्या मालकीचे आहेत. त्यामुळे अनेकदा काही प्लॅटफॉर्म बंद झाल्याचं किंवा मोठ्या कंपन्यांनी विकत घेतल्याचं आढळते. अशावेळी या नोंदणीकृत प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या गुंतवणूकीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. हे प्लॅटफॉर्म भविष्यात अस्तित्वात नसले तरी तुम्ही गुंतवलेले पैसे म्युच्युअल फंडाच्या खात्यात जातात आणि तुमच्या गुंतवणुकीची देखरेख करण्यासाठी फंडाकडे सेबी मान्यताप्राप्त रजिस्ट्रार असतो.
तेव्हा तुम्हालाही म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही फंड हाऊसशी संपर्क साधू शकता. तुमचा अनुभव, घेतले जाणारे शुल्क, मिळणाऱ्या सेवा आणि व्यवस्थापन टीमवर विश्वास असेल तर डायरेक्ट प्लॅटफॉर्मची निवड करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या फंडात गुंतवणूक करा. तुमची गुंतवणूक फंड हाऊसकडे सुरक्षित आहे याची खात्री बाळगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.