मुंबई, 29 नोव्हेंबर : सर्वसामान्य माणसाला आपल्या आयुष्यातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तरतूद (Financial Investment) करण्याची मोठी जबाबदारी असते. सरकारने निवृत्तिवेतन (Pension) पद्धत बंद केल्यानं आता निवृत्तीवेतन मिळणाऱ्या नागरिकांचं प्रमाण कमी आहे. त्याचप्रमाणे कालानुरूप महागाई (inflation) वाढत असल्याने फक्त निवृत्तीवेतनावर अवलंबून राहणंही शक्य नसते. सध्याच्या काळात शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेकांकडे निवृत्तीनंतर असणारी शिल्लक कमी असते. अनेकांना नोकरीच्या कालावधीत मोठी गुंतवणूक करणं जमत नाही; मात्र पीएफ (PF -Provident Fund) किंवा पेन्शन फंडात पैसे जमा केल्यानं सेवानिवृत्ती निधी असतो; पण त्याचं प्रमाण पुरेसं नसतं.
स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना वृद्धापकाळासाठी कशी गुंतवणूक करावी असा प्रश्न असतो. अनेक जण फक्त पगारातून राहिलेली शिल्लक बँकेच्या सेव्हिंग खात्यात ठेवतात. गुंतवणूक करण्याबाबत त्यांना फार माहिती नसते. त्यामुळे त्यांची संपत्ती वाढत नाही. अर्थात गेल्या काही वर्षांत याबाबत बरीच जनजागृती झाल्यानं आता नागरिक बचतीकडून गुंतवणुकीकडे वळले आहेत. म्युच्युअल फंडाचा पर्याय उत्तम असल्याची माहिती अनेकांना झाली आहे. त्यामुळे त्यातली गुंतवणूक लक्षणीयरित्या वाढली आहे. म्युच्युअल फंडातल्या (Mutual Fund) गुंतवणुकीच्या आधारे तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी भरभक्कम तरतूद करू शकता. यासाठी म्युच्युअल फंडात एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) म्हणजेच दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवण्याचा पर्याय उपयुक्त ठरतो. त्याआधारे 25 वर्षांत 10 कोटी रुपयांचा निधी जमा करणंदेखील शक्य आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सिगरेटमुळे वाचले प्राण, डोळ्यांदेखल कोसळलं भलंमोठं झाड; पाहा, थरारक VIDEO
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, 25 वर्षांत बँकेची (Bank) कोणतीही योजना 10 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याइतका परतावा देऊ शकत नाही. यासाठी म्युच्युअल फंड अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. त्यात एसआयपीद्वारे किमान रक्कम जमा केली, तरी शेवटी मोठा निधी जमा होतो. म्युच्युअल फंडाद्वारे कमी वेळेत मोठा निधी जमा करण्यासाठी एक सूत्र आहे ते म्हणजे 15-15-15. 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये ठेव आणि 15 टक्के परतावा गृहीत धरला, तर तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. त्याचप्रमाणे कालावधी वाढवला तर निधीत आणखी भर पडू शकते. तसंच गुंतवावी लागणारी रक्कमही कमी करता येते. समजा तुम्ही 25 वर्षं गुंतवणुकीचं नियोजन केलं असेल आणि दरमहा 11,000 रुपये जमा केले, तर 25 वर्षांत 10 कोटी रुपये सहज जमा होतील. अर्थात योग्य म्युच्युअल फंडाची निवड महत्त्वाची ठरते. तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडांनी किमान 15 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा दिला, तर हे उद्दिष्ट सहजसाध्य होते. एसआयपीमुळे सरासरी परतावा मिळण्याचा लाभ मिळतो. त्यामुळे किमान 15 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा सहज मिळतो.
'ओमिक्रॉन'चा दबाव, शेअर बाजारात पडझड सुरुच; फार्मा सेक्टरव्यतिरिक्त सर्व सेक्टर लाल निशाण्यावर
चांगला परतावा मिळण्याकरिता एसबीआय स्मॉल कॅप फंड, रेग्युलर ग्रोथ, आदित्य बिर्ला सन लाइफ मिड फंड प्लॅन ग्रोथ रेग्युलर प्लॅन आणि एचडीएफसी टॉप 100 फंड रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरतं. याशिवाय अनेक असे फंड आहेत ज्यांनी 15 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. मिराई अॅसेट लार्ज कॅप फंडाने (Mirae asset large cap fund) 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 18.91 टक्के आणि 5 वर्षांत 18.15 टक्के परतावा दिला आहे. अॅक्सिस ब्लूचिप फंडाने (Axis Blue chip Fund) 3 वर्षांत 21.61 टक्के आणि 5 वर्षांत 20.49 टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडाने (ICICI Prudential Blue Chip Fund) 3 वर्षांत 18.62 टक्के आणि 5 वर्षांत 16.78 टक्के परतावा दिला आहे. एसबीआय ब्लूचिप फंडाने (SBI Bluechip Fund) 3 वर्षांत 19.17 टक्के आणि 5 वर्षांत 15.85 टक्के परतावा दिला आहे. एसबीआय फ्लेक्सीकॅप फंडाने (SBI Flexicap Fund) 3 वर्षांत 20 टक्के आणि 5 वर्षांत 16.96 टक्के परतावा दिला आहे. कोणत्याही बँकेच्या किंवा पोस्टाच्या गुंतवणूक योजनेत इतका परतावा मिळत नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करणं शक्य नसतं. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून हे सहज शक्य होते. तेव्हा तुम्हालाही 10 कोटींचा निधी जमा करायचा असेल, तर 25 वर्षांच्या गुंतवणुकीचं नियोजन करा. जितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली जाईल, तितकी गुंतवणुकीची रक्कमही कमी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Mutual Funds