मुंबई, 21 मार्च: गुढीपाडवा या सणाला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेकजण घर, गाडी किंवा इतर वस्तू खरेदी करतात. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी वाहनांची सर्वात जास्त विक्री होते. मात्र, या वर्षी मुंबईकर गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी करण्यास उत्सुक नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या वर्षी मुंबईमध्ये नवीन कार खरेदीच्या नोंदणीमध्ये 50 टक्के आणि बाईक खरेदीच्या नोंदणीमध्ये 28 टक्के घट झाल्याचं समोर आलं आहे. ही घट होण्यामागे नवीन मेट्रो लाईन्स कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मुंबईतील काही कार डीलर्सनी मान्य केलं आहे की, या महिन्यात वाहनांच्या चौकशीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. डीलर्सनी सांगितलं की, पश्चिम उपनगरात 2A आणि 7 मेट्रो लाइन सुरू झाल्यामुळे नागरिकांकडे 'जलद प्रवास' करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. वाहन खरेदीची नोंदणी कमी होण्यासाठी ही बाब कारणीभूत असू शकते. विशेष म्हणजे, 2A आणि 7 मेट्रो लाईन्स संपूर्ण पश्चिम उपनगरात, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि लिंक रोडच्या बाजूने जातात. या क्षेत्रातच अंधेरी आणि बोरिवली आरटीओमध्ये सहसा सर्वाधिक वाहनांची नोंदणी होते.
देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? काय आहे त्यांचा बिझनेस? नेटवर्थ पाहून व्हाल थक्क!
सामान्यपणे गुढीपाडव्याच्या आधी वाहनांच्या नोंदणीमध्ये वाढ होत असते. पण, या वर्षी असं झालं नाही. वाहतूक तज्ज्ञ विवेक पै म्हणाले, "कार नोंदणी कमी होणं हे सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य वेळ आल्याचं सूचक आहे. 1, 2A आणि 7 या मेट्रो लाईन्स शहरासाठी गेम चेंजर ठरतील. कमी किमतीची तिकिटं आणि हॅपी अवर्स ऑफर करून सरकारनं बस आणि एसी ट्रेन्ससह एकूणच सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे." लोकांना खासगी वाहनं खरेदी करण्यापासून परावृत्त करण्यासाठी फक्त बससाठी लेन तयार केले जावेत, असंही पै यांनी सुचवलं.
रेल्वे स्टेशनवर चहा-कॉफीपासून ते WiFi पर्यंत सर्व काही फ्री हवंय? हे क्रेडिट कार्ड आहेत बेस्ट
पब्लिक पॉलिसी (वाहतूक) अॅनॅलिस्ट परेश रावल म्हणाले की, लोक केवळ खासगी वाहनांची चांगली मॉडेल्स बाजारात येण्याची वाट पाहत नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांचे प्लॅन्स रोखून धरू इच्छितात. "नवीन पायाभूत प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी संपूर्ण शहरातून प्रवास करण्याची पद्धत बदलते का, याचं त्यांना मूल्यमापन करायचं आहे. जर वर्षभरात रस्त्यांवर अशीच गर्दी टिकून राहिली, तर ते खासगी वाहन घेण्याचा विचार करतील," असं रावल म्हणाले.
शहरातील एका कार विक्रेत्यानं सांगितलं की, अलीकडे वाहनांच्या किमतीही वाढल्या आहेत आणि त्यामुळे काही खरेदीदारांसाठी हा त्रासदायक घटक ठरला आहे. ते म्हणाले की, कोविडच्या गेल्या दोन वर्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी अनेकांनी वैयक्तिक कार आणि बाइक्सना प्राधान्य दिल्यानं वाहन विक्री गगनाला भिडली होती. पण, आता कोविड -19 चा धोका बराचसा कमी झाला आहे. तसेच, दर महिन्याला वाहनांची दोन ते तीन मॉडेल्स लाँच केली जातात. काही खरेदीदार इलेक्ट्रिक सेगमेंट सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
पब्लिक पॉलिसी (वाहतूक) अॅनॅलिस्ट परेश रावल म्हणाले, "खरेदीदार अजून चांगली बॅटरी क्षमता, तंत्रज्ञान आणि बॅटरीच्या किमतीत बदल असलेल्या वाहनांची अपेक्षा करत आहेत. भविष्यात ई-कार आणि ई-बाईकच्या किमती कमी होतील अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकवर स्विच करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते प्रत्येक पर्याय तोलून मापून बघत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vehicles