नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना वाढत्या महागाईने आणखीच हैराण केलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या दररोजच्या वाढत्या किंमतींसह (Petrol-Diesel Price Hike) घरगुती गॅस सिलेंडरचे दरही (LPG Price) चांगले वाढले. फेब्रुवारी आणि मार्च 2021 दरम्यान गॅस सिलेंडरचे दर 125 रुपयांपर्यंत वाढले. अशात आता इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून (IOC) सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात केली आहे. हे नवे दर 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती गेल्या दोन महिन्यात 125 रुपयांनी वाढल्या होत्या. 4 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर 25 फेब्रुवारीला पुन्हा 25 रुपये आणि 1 मार्च रोजी पुन्हा इतकीच किंमत वाढवण्यात आली. आता एप्रिलपासून किंमती काहीशा कमी होणार आहेत.
(वाचा - PAN-Aadhaar Linking: इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट हँग,SMSद्वारे असं करा लिंक )
(वाचा - कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी;1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार,काय आहे सरकारचा प्लॅन )
तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरचे नवे दर ठरवतात. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, आता 1 एप्रिल 2021 पासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी 10 रुपये कमी मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यात वाढलेल्या किंमती पाहता, आता कमी केलेली किंमत अतिशय कमी आहे. परंतु या महागाईमध्ये सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.