Home /News /money /

कोरोना काळात नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर

कोरोना काळात नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनियरने सुरू केला भाजी विकण्याचा व्यवसाय,आता होतोय 10 लाख टर्नओव्हर

एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने एक अ‍ॅप तयार करुन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एका युवकाने खिळे तयार करण्याचा, तर दुसऱ्या एका युवकाने साजूक तुपातील गुळ पावडर तयार करुन त्याची विक्री करण्याचा मार्ग निवडला आहे. हे तिघे अन्य बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

पुढे वाचा ...
भोपाळ, 10 मे : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने (Corona) कहर केला आहे. परिणामी सरकारने लॉकडाऊन (Lockdown) किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधाचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर झाल्याचं चित्र आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर अनेकांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे रोजगाराअभावी काहीसं नकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र असेही काही युवक आहेत, ज्यांनी या आपत्तीत देखील संधी शोधली आहे. नोकरी गेली म्हणून हताश न होता, त्यांनी उत्पन्नाचे वेगळे मार्ग शोधले. सध्या यापैकी काही युवक या वेगळ्या वाटेवर यशस्वी होताना दिसत आहेत. भोपाळमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने एक अ‍ॅप तयार करुन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एका युवकाने खिळे तयार करण्याचा, तर दुसऱ्या एका युवकाने साजूक तुपातील गुळ पावडर तयार करुन त्याची विक्री करण्याचा मार्ग निवडला आहे. हे तिघे अन्य बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. गुळ व्यवसायातून होतेय 10 ते 12 लाखांची कमाई - दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 55 वर्षीय राकेश उदानिया यांनी कोरोना महामारीला (Corona Pandemic) सुरुवात झाल्यानंतर 6 महिन्यांनी आपला व्यवसाय बदलला. नरसिंहपूर जिल्ह्यातील नारंगी गावाचे रहिवासी राकेश गेल्या 6 महिन्यांपासून भोपाळ येथे कार्यरत आहेत. एकदा ते भोपाळ येथील बाजारातील जत्रेत गेले होते. तेथे त्यांना एका अधिकाऱ्याच्या मदतीने शुध्द तुपातील गुळ पावडर (Jaggery Powder) निर्मितीची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली. या गुळ पावडरपासून तयार केलेले चॉकलेट फार पौष्टीक मानले जाते. त्यामुळे सध्या याला मोठी मागणी आहे. याबाबत राकेश म्हणतात, मी पूर्णतः आशा सोडली होती. परंतु, या गुळ व्यवसायाने मला संजीवनी दिली. आता माझा महिन्याचा टर्नओव्हर 10 ते 12 लाख रुपये आहे. या माध्यमातून त्यांनी डझनभर लोकांना रोजगार दिला आहे. कोरोनाने आम्हाला नव्याने विचार करायला शिकवल्याचे राकेश सांगतात.

(वाचा -सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप)

6 महिन्यांत टर्नओव्हर पोहोचला 1 कोटींवर - भोपाळ येथील 35 वर्षीय सोहित विश्वकर्मा यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये खिळे निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. मी तीन वर्षांपासून टाईल्सची कामं करत होतो. परंतु, कोरोनामुळे (Covid-19) या व्यवसायात मंदी आली. या स्थितीत काय करावं, हे मला सुचत नव्हतं, असं सोहित सांगतात. याच दरम्यान त्यांची ओळख खादी ग्रामद्योग विकासचे नोडल अधिकारी संजीव राणा यांच्याशी झाली. त्यांनी मदत करण्याचं मान्य केलं. त्यानंतर मार्केट रिसर्च सुरू झाला. त्यावेळी भोपाळमध्ये खिळ्यांचा तुटवडा भासत असल्याचं लक्षात आले. इंदूरमधून भोपाळमध्ये 80 टक्के खिळे आयात होत असल्याचं सोहित सांगतात. त्यानंतर जवळील पैसे आणि कर्जाच्या आधारे मी व्यवसाय सुरू केला. केवळ 6 महिन्यांत माझा टर्नओव्हर (Turnover) 1 कोटींवर गेला. कोरोनामुळे रोजगार गेलेल्या 8 लोकांना रोजगार देऊ शकल्याचं सोहित विश्वकर्मा यांनी सांगितलं.

(वाचा - Success Story: चहा विकून कोट्यधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी)

भाजीच्या गाडीवरील गर्दी पाहून सुचली व्यवसायाची कल्पना - कटारा हिल्स येथील 38 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सावन चौरे कोरोना येण्यापूर्वी अनेक कंपन्यांबरोबर काम करत होते. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागला आणि काम बंद झालं. त्यानंतर ते घरीच बसून होते. एक दिवस त्यांच्या घराजवळ महापालिकेची गाडी भाजी विक्रीसाठी आली. त्यावेळी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. यावेळी त्यांना भाजी विक्रीची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी मित्रांच्या मदतीने डेली नीड्स नावाने वेबसाईट आणि अ‍ॅप सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि ग्राहकांना एकमेकांशी जोडलं. परंतु, याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ते स्वतःच भाजी खरेदीसाठी बाजारात पोहोचले. ते आता अ‍ॅप आणि प्रत्यक्ष मिळणाऱ्या आर्डरनुसार भाजी पोहोच करण्याचं काम करतात. त्यांना एका महिन्यातच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी भाजीसोबतच भुसार मालाची विक्री सुरू केली. दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांनी भाजी, भुसारबरोबर दुध आणि दह्याची थेट घरपोच विक्री सुरू केली. सध्या त्यांचा 10 लाख रुपये प्रतिमहिना टर्नओव्हर आहे.
First published:

पुढील बातम्या