नवी दिल्ली, 16 जून: तुम्ही देखील सोन्याच्या दागिन्यांची (
Gold Jewellery) खरेदी केली असेल तर आता हॉलमार्किंगचा (
gold hallmarking) नियम बदलल्यानंतर त्याबाबत काय होणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग जरूरी असणार आहे. हॉलमार्किंगशिवाय दागिन्यांची विक्री करण्याची शेवटची तारीख 15 जून होती. अर्थात आजपासून कोणत्याही व्यापाऱ्याला हॉलमार्किंग नसणारे कोणतेही दागिने विकता येणार नाहीत. अशावेळी ज्यांच्याकडे आधीच दागिने खरेदी केलेले आहेत आणि ज्यावर हॉलमार्क नाही आहे, त्या दागिन्यांचं काय होणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
तर याचं उत्तर असं आहे की 15 जून 2021 नंतरही तुम्ही हॉलमार्किंग नसणारे दागिने एक्सचेंज करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ज्वेलरकडे जाऊन तुमचे दागिने हॉलमार्क देखील करू शकता. हॉलमार्किंगचा हा नियम सोने विक्री करणाऱ्या ज्वेलर्ससाठी लागू करण्यात आला आहे. ग्राहक त्यांच्याकडील दागिने हॉलमार्कशिवाय विकू शकतात.
हे वाचा-आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार देणार 50000 कोटी, वाचा काय आहे पूर्ण योजना
ग्राहकांना मिळेल हॉलमार्किंचा फायदा
गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत सरकार गेली दीड वर्ष योजना आखत आहे आणि आजपासून हा आदेश संपूर्ण देशात लागू होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती (
Coronavirus in India) लक्षात घेता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्यता लागू करण्याची तारीख पुढे ढकलली होती. मात्र आता देशात केवळ हॉलमार्किंग असणारीच ज्वेलरी विकली जाईल. सोन्याच्या शुद्धतेबाबत होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे. केंद्र सरकारने अशाप्रकारे दागिने विकण्यासाठीची नवी व्यवस्था लागू करण्यासाठी एक समितीही बनवली आहे. ही व्यवस्था लागू करताना काही समस्यांचा सामना करावा लागला तर ही समिती त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल.
गोल्ड हॉलमार्किंग काय आहे?
केंद्र सरकारने अशी माहिती दिली आहे की, गोल्ड हॉलमार्किंग देशातील सर्व सोने व्यापाऱ्यांना त्यांच्यकडील दागिने किंवा इतर कलाकृती विकताना लागू होईल. त्यांना बीआयएस स्टँडर्डचे मानक पूर्ण करणं आवश्यक असेल, तसं न केल्यास कठोर कारवाई देखील होऊ शकते. निवेदनानुसार 16 जूनपासून 256 जिल्ह्यांमध्ये सराफांने केवळ 14, 18 आणि 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने विकण्यास परवानगी मिळेल. अतिरिक्त 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्यासाठीही हॉलमार्किंग अनुमती लागेल.
हे वाचा-Gold Price Today: सोनंखरेदीची योग्य संधी! महिनाभरातील निचांकी पातळीवर दर
होऊ शकते जेल
सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.