मुंबई, 24 फेब्रुवारी : भारतीय वंशांच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजतो आहे. सध्या बहुतांशी प्रसिद्ध कंपन्या आणि संस्थाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. यामध्ये आता लवकरच अजय बंगा यांच्या नावाचाही समावेश होणार आहे. अजय बंगा यांच्याकडे वर्ल्ड बँकेचं नेतृत्व येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी वर्ल्ड बँकेचं नेतृत्व करण्यासाठी अमेरिकी उद्योजक अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली आहे. बंगा हे मूळ भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी बँकेनं अधिक जोर लावावा यासाठी अमेरिकेनं दबाव वाढवला आहे. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मॅलपास यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर बंगा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 'बीबीसी'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कोण आहेत अजय बांगा?
सध्या अमेरिकेचे नागरिक असलेले बंगा यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात भारतातून केली होती. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. बंगा यांनी नेस्ले आणि सिटी ग्रुपमध्ये काम केलं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड जायंट मास्टरकार्डमध्ये त्यांनी जवळपास दशकभर काम केलं. 2021 मध्ये त्यांनी मास्टरकार्डमधून निवृत्ती घेतली. सध्या ते जनरल अटलांटिक या खासगी इक्विटी फर्ममध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात. तिथे ते 3.5 अब्ज डॉलर्सच्या हवामान निधीच्या सल्लागार मंडळामध्ये आहेत. त्यांनी व्हाईट हाउससोबत मध्य अमेरिकेसाठी भागीदारी या क्षेत्रातील सह-अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. अमेरिकेत स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी या परिसरातील खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशासाठी त्यांनी योगदान दिलं आहे.
कोण आहेत विवेक रामास्वामी? ज्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत घेतली उडी
यूएस अधिकार्यांनी सांगितलं की, बँकेला खासगी क्षेत्रासोबत तिची इतर उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी मदत करण्याचा अनुभव बंगा यांच्याकडे आहे. वर्ल्ड बँकेच्या पुढील प्रमुखाची अधिकृतपणे नियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या मंडळावर अवलंबून आहे.
बँकेनं बुधवारी (22 फेब्रुवारी) सांगितलं की, शॉर्टलिस्ट केलेल्या तीन उमेदवारांची मुलाखत घेण्याची योजना आखली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बँकेला नवीन अध्यक्ष मिळेल अशी आशा आहे. बँकेच्या वतीनं महिला उमेदवारांना जास्त प्रोत्साहन देण्यात आलं आहे. अध्यक्ष निवडीबाबत इतर देश आपल्या सूचना मांडतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
जपानमध्ये समुद्रकिनाऱ्यावर गोंधळ! महाकाय गोळा मिळाल्याने सरकारकडून अलर्ट; काय आहे प्रकार?
बांगा यांना प्रदीर्घ अनुभव
"बंगा यांच्याकडे व्यवसाय करण्याचा अनेक दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये बँकेबाबत विश्वास निर्माण होण्यास मदत होऊ शकते. विशेषत:, अनेकदा आंतरराष्ट्रीय संस्थांवर टीका करणाऱ्या रिपब्लिकन्सचं बँकेबाबत असलेलं मत बदलण्यास बंगा यांची मदत होऊ शकतं," असं सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटच्या कार्यकारी उपाध्यक्ष अमांडा ग्लासमन म्हणाल्या.
त्या असंही म्हणाल्या की, बँकेच्या प्रमुखपदासाठी बंगा हे सर्वोत्तम व्यक्ती आहेत की नाही हे पाहणं बाकी आहे. कारण, त्यांना सरकारचा आणि बँकेच्या कामाचा मुख्य भाग असलेल्या विकास कामांचा कमी अनुभव आहे. बँकेनं कशी वाटचाल केली पाहिजे, याविषयी त्यांचा दृष्टीकोन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
जी कोणी व्यक्ती बँकेची प्रमुख होईल तिला कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या तत्काळ आर्थिक गरजांचा समतोल साधण्याचं आव्हान पेलावं लागेल. अनेक देशांना कर्जाच्या संकटाचा सामना करावा लागेल, तसेच हवामान बदल, जागतिक संघर्ष आणि साथीच्या रोगांचे धोके यांसारख्या समस्यांना सामोरं जावे लागेल. विशेष म्हणजे, अतिरिक्त पैशांची उपलब्धता स्पष्ट नसताना ही सर्व आव्हानं पेलावी लागतील.
मिस ग्लासमन म्हणाल्या, "जागतिक बँकेच्या धोरणाच्या पुढच्या टप्प्यावर अनेक बाबी आहेत. हा एक असा क्षण आहे, जेव्हा जागतिक बँक खरोखर काहीतरी पाऊल उचलू शकते किंवा दुर्लक्षित होऊ शकते. बँकेला विकसित करणं आवश्यक आहे यावर सर्वसाधारण एकमत आहे. मात्र, ती कशाप्रकारे विकसित करावी याबाबत एकमत नाही. तातडीनं समतोल कृती करणं आवश्यक आहे, त्याबद्दल खरी चिंता आहे."
बंगा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते डेव्हिड मॅलपास यांची जागा घेतील. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी डेव्हिड यांची शिफारस केली होती. काही दिवसांपूर्वी डेव्हिड यांनी जूनपर्यंत या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.
त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच ते पद सोडत आहेत. वातावरणातील बदलांना तोंड देण्यासाठी बँकेच्या साधनांचा वापर करण्यात स्वारस्व न दाखवल्याबद्दल अनेक पर्यावरणवाद्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. गेल्या वर्षी, 'जीवाश्म इंधनामुळे हवामान बदल घडत आहे की नाही हे माहीत नाही', असं जाहीर विधान केल्यानंतर व्हाईट हाउसनं डेव्हिड यांना फटकारलं होतं. नंतर, याबद्दल डेव्हिड यांनी माफीही मागितली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, World bank