नवी दिल्ली 19 एप्रिल : पोस्टाच्या (Post Department) विविध बचत योजना या सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजना म्हणून सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांचा व्याजदर (Interest Rate) चांगला असतो तसंच ही गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित (Secure)असते. कर बचतीचाही लाभ घेता येतो.
पोस्टाची रिकरिंग योजना (recurring Scheme) अर्थात आवर्ती ठेव योजनाही अत्यंत लाभदायी असून,किमान शंभर रुपयांपासून यात गुंतवणूक करता येते. याच योजनेत दरमहा दहा हजार रुपये दहा वर्षे गुंतवल्यास 16 लाख रुपये मिळू शकतात. सध्या या योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळत आहे. दरमहा दहा हजार रुपये याप्रमाणे दहा वर्षात तुमची गुंतवणूक होते 12 लाख रुपये त्यावर 5.8 टक्के दरानं 4 लाख 28 हजार रुपये व्याज मिळेल, त्यामुळं मुदतीनंतर तुम्हाला सोळा लाख 28 हजार रुपये मिळतील. सध्याच्या काळात बँकाचे व्याजदर कमी झालेले असताना त्यापेक्षा अधिक व्याजदर देणारी ही योजना नक्कीच लाभदायी आहे.
रिकरिंग योजनेची वैशिष्ट्ये :
- या योजनेत सिंगल (Single ) किंवा जॉईन्ट खात्याची (Joint Account) सुविधा मिळते. जॉईन्ट खात्यात 3 लोकांचे नाव घालता येते.
- 10 वर्षांपुढील मुलाच्या नावावरही खाते उघडता येते.
- या योजनेची मुदत पाच वर्षे असते, ती अर्ज करून दोन वेळा पाच वर्षे वाढवता येते.
- यात दरमहा किमान 100 रुपये जमा करावे लागतात. वेळेत पैसे जमा न केल्यास 100 रुपयांवर 1 रुपया पेनल्टी द्यावी लागते.
- खातं उघडल्यानंतर तीन वर्षांनतर मुदतीच्या आधीच बंद करता येते.
- या योजनेच्या व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो.
- ही योजना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरीत (Transfer) करता येते.
- या योजनेतील गुंतवणुकीवर कर्जही (Loan) मिळू शकते. एक वर्षानतर जमा रकमेच्या 50 टक्के रकमेवर एकदा कर्ज घेता येते.
अतिशय लाभदायी अशी ही योजना असून एकाचवेळी मोठी रक्कम भरण्याची गरज नसल्यानं दरमहा झेपेल त्याप्रमाणे प्रत्येकजण यात गुंतवणूक करू शकतो. किमान 100 रुपये आणि त्या पुढं दहाच्या पटीत पैसे गुंतवता येतात. मुलांचे, शिक्षण, लग्न अशा मोठ्या खर्चांची तरतूद करण्यासाठी या योजनेत योग्य वेळी गुंतवणूक केल्यास एकरकमी मोठी रक्कम मिळू शकते. अधिक व्याजदर आणि सुरक्षितता ही या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Post office money, Post office saving, Savings and investments, Scheme