मुंबई, 10 नोव्हेंबर : कधी काळी इन्स्टंट लोन (Instant Loan) अर्थात झटपट कर्जासाठी मोठा संघर्ष करायला लागत असे. लांबच लांब रांगेत कित्येक तास थांबावं लागे. परंतु, आता हे दिवस संपले आहेत. आता या कारणामुळे फसवणुकीच्या (Fraud) घटनांमध्ये मात्र वाढ होत असून, डेटाच्या सुरक्षेबाबत (Data Security) प्रश्न उपस्थित होत आहेत.
`न्यूज 18` ने या विषयावर तज्ज्ञांशी संवाद साधला. `स्मार्टकॉइन`चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक रोहित गर्ग यांनी सांगितलं, की `तुम्ही तुमच्या मोबाइलमधल्या इन्स्टंट लोन अॅप्सच्या (Instant Loan Apps) माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अगदी सहजपणे अर्ज करू शकता. या माध्यमातून ज्या वेगानं कर्जाची रक्कम वितरित होते, ते पाहून कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक व्यक्तीला निश्चितच कौतुक वाटतं. परंतु, ठराविक कालावधीनंतर काही व्यक्तींना यात काहीतरी गडबड आहे, असं जाणवू लागतं. माझा डेटा सुरक्षित आहे का, संबंधित कंपनी माझ्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर तर करणार नाही ना, असे प्रश्न निर्माण होऊ लागतात. या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू या.`
केवायसी (KYC) कागदपत्रं असोत किंवा बॅंकिंग तपशील, यातूनच असते फसवणुकीची शक्यता
सध्याच्या काळात वैयक्तिक डेटा म्हणजे डिजिटल करन्सी (Digital Currency) मानला जातो. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा विचार करणं अत्यावश्यक आहे. केवायसी कागदपत्रं, बॅंकिंग तपशीलासारखी वैयक्तिक माहिती लीक (Leak) होणं हे संकटाला आमंत्रण ठरू शकतं. तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याची आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता पूर्णपणे या दोन घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे याविषयी तपशीलवार जाणून घेऊ या.
खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम
कर्ज देणारी संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही हे जाणून घ्यावं
तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील की नाही याची खात्री करण्याची पहिली पायरी म्हणजे कर्ज घेण्यासाठी योग्य संस्थेची निवड करणं होय. कर्ज देणारी संस्था प्रमाणित आहे ना आणि कमी व्याज दराने जास्त कर्ज रक्कम देण्याचं आश्वासन देऊन तुम्हाला कोणी प्रलोभन दाखवत नाही ना? हे सर्वप्रथम तुम्हाला तपासावं लागेल. असे काही मार्ग आहेत, की ज्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन लोन पोर्टलची (Online Loan Portal) वैधता पडताळू शकता, अशी गर्ग यांनी त्याबद्दल माहिती दिली.
वेबसाईटवरून संस्थेचा संपर्क, पत्त्याचा तपशील नोंदवा
अशा प्रकारे कर्ज देणाऱ्या संस्थांची चौकशी करण्यासाठी, त्यांची सत्यता पडताळण्यासाठी संस्थेच्या वेबसाईटवर दिलेली संपर्क, पत्ता आदी माहिती नोंद करून घ्यावी. यामुळे संबंधित कंपनी अस्तित्वात आहे की नाही, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून चालवली जाणारी ती कंपनी बनावट आहे की खरी, हे देखील तुम्हाला कळू शकेल. गरज पडल्यास तुम्ही वेबसाइटवरच्या संपर्क क्रमांकावर फोन करून देखील कंपनीबाबतची सत्यता पडताळू शकता.
यूआरएल `HTTP`ऐवजी `https` असेल तर कंपनी सुरक्षित आहे
प्रत्येक कंपनीची वेबसाइट तिचे व्यावसायिक हेतू स्पष्ट करत असते. वेबसाइट सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड (Encrypted) असेल तर ते पोर्टल अस्सल आहे असं समजावं. जेव्हा तुम्ही ऑनलाइन लोन वेबसाइटवर जाल, तेव्हा एकदा अॅड्रेस बारवर अवश्य नजर टाकावी. तुम्हाला वेब अॅड्रेसनजीक लॉक आयकॉन दिसत असेल आणि यूआरएल HTTP ऐवजी https ने सुरू होत असेल, तर ती वेबसाइट सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड समजावी.
आकर्षक सौदे म्हणजे घोटाळ्याचा इशारा
रोहित गर्ग म्हणाले, की तुमच्यासमोर अविश्वसनीय वाटणारे आकर्षक सौदे आले तर सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे प्री-प्रोसेसिंग पेमेंटविषयी विचारपूस करणं, पार्श्वभूमीची माहिती न घेता थेट कर्ज देणं यांसारखी फसवणूक किंवा घोटाळ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे. या सर्व बाबी पहिल्या टप्प्यात आकर्षक वाटतील; पण पाऊल पुढे टाकण्यापूर्वी विचार करणं आवश्यक आहे. लोन पोर्टल तुम्हाला आकर्षक आणि वास्तववादी दिसत असलं तरी त्यांच्याकडे सुरक्षेविषयी पुरेशी उपाययोजना नसेल तर तुम्ही डेटा चोरणाऱ्यांच्या रडारवर आहात, असं समजावं.
14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर
पोर्टलशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच नको
पोर्टलशी संपर्क साधण्याबाबत कोणताही संकोच करू नका. तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घ्या. संबंधित कंपनी डेटा सुरक्षेबाबत आणि सुरक्षित व्यवहारांसाठी कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करते हे जाणून घेण्यासाठी अगदी मुक्तपणे त्यांना प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, स्मार्टकॉईनमधला डेटा एन्क्रिप्ट केलेला असतो. त्याच्या संभाव्य उपयोगाची माहिती गोपनीयता धोरणामध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असते, असं रोहित गर्ग यांनी सांगितलं.
पोर्टल आणि त्यांच्या तंत्रज्ञानावर रिसर्च करा
रोहित गर्ग म्हणाले, की लोकांची बरी-वाईट मतं वाचण्याची सवय लावून घेणं आवश्यक आहे. यामुळे पोर्टलमधल्या कमतरतेचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. अनेकांनी डेटा चोरीचा आणि सुरक्षितेतच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला असेल तर कदाचित उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांचा शोध घेणं सर्वोत्तम ठरू शकतं.
थर्ड पार्टीची भागीदारी
तुम्हाला कर्ज सुविधा देण्यासाठी संबंधित कंपनीत कोणती थर्ड पार्टी (Third Party) समाविष्ट आहे का याचा शोध आवश्य घ्या. त्या कंपन्यांसोबत कोणती माहिती शेअर केली जाते याचा शोध घ्या. तसंच ती कंपनी खरी आहे का हे देखील तपासा. सहसा याच टप्प्यावर डेटाची देवाणघेवाण होते आणि अनेकदा कमाई देखील केली जाते, असं गर्ग यांनी सांगितलं.
तुमचा डेटा सुरक्षित करण्याच्या काही पायऱ्या
ही माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असल्यानं स्कॅमर्सना तिचा अभ्यास करता येतो. त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित हातात असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही दक्ष आणि जागरूक असणं गरजेचं आहे. `स्मार्टकॉइन`मध्ये आम्ही आमच्या अॅपद्वारे तुम्हाला तातडीनं कर्ज वितरित करतोच; पण त्यासोबत तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यावरही भर देतो, असं गर्ग यांनी स्पष्ट केलं.
इन्स्टंट लोन यासाठी आहे लोकप्रिय
तत्काळ सेवेसोबतच असं कर्ज कोणत्याही तारणाशिवाय घेता येतं. या प्लॅटफॉर्मवर अर्ज करताना, कर्जदाराकडून केवळ केवायसी कागदपत्रं आणि उत्पन्नाचा तपशील यांसारखी मूलभूत माहिती विचारली जाते आणि पात्रता निकषांवर तुम्हाला कर्जाची रक्कम त्वरित मिळते, असं गर्ग यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Instant loans, Money