Home /News /money /

Home loan : गृहकर्ज घेताना व्याजदर तपास, सोबत इतर शुल्क तपासणंही महत्त्वाचं

Home loan : गृहकर्ज घेताना व्याजदर तपास, सोबत इतर शुल्क तपासणंही महत्त्वाचं

गृहकर्जासाठी साधारण किती व्याजदर आहे याचा अंदाज यातून येईल; पण व्याजदराबरोबरच बँका, वित्तीय संस्था प्रक्रिया शुल्कही (Processing Fee) आकारतात. कर्ज देण्यापूर्वी कर्ज देणाऱ्या बँकेला किंवा संस्थेला कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता जाणून घेणं आवश्यक असतं.

पुढे वाचा ...
मुंबई, 8 डिसेंबर : प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर हवं असतं. आपल्या कुटुंबाला सुरक्षित, कायमस्वरूपी हक्काचा निवारा देण्यासाठी प्रसंगी कर्ज घेऊन (Loan) घर घेतलं जातं. अनेकदा बँका (Bank) किंवा वित्तीय संस्था (Financial Institutes) गृहकर्जाचे (Home loan) व्याजदर (Interest rate) कमी केल्याची जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे अनेक ग्राहक गृहकर्जाचे व्याजदर कमी झाले, की घर विकत घेण्याचा विचार करतात. सध्या कोरोना संकटामुळे मंदी आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करण्यात आले आहेत. तसंच बांधकाम क्षेत्रातही विक्री वाढण्यासाठी व्यावसायिक अनेक सवलती देत आहेत. गृहकर्जाचे व्याजदर कमी झाल्याने घर घेणं फायद्याचं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक कर्जाच्या कमी व्याज दराचा फायदा घेण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहेत; मात्र कर्ज घेताना बहुतांश व्यक्ती केवळ व्याजदराचा विचार करतात. कर्ज घेताना त्यावर इतरही अनेक प्रकारचं शुल्कं आकारलं जातं. त्यामुळे कर्ज महागच ठरतं. त्यामुळे कर्ज घेताना व्याजदराबरोबरच इतर शुल्क किती आहे हे जाणून घेणं, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणं आवश्यक असतं. 'आउटलूक इंडिया'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सध्या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातली सर्वांत मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 30 लाखांपर्यंतच्या कर्जावर 6.90 टक्के दराने, तर 30 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 7 टक्के दराने व्याज आकारते. एचडीएफसी बँक (HDFC Bank) 30 लाखांपर्यंत 6.70 टक्के, तर 35 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी 7 टक्क्यांपासून पुढे व्याजदर आकारते. पंजाब नॅशनल बँक (PNB) 30 लाखांपर्यंत 6.95 टक्के आणि 35 लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या कर्जासाठी 7.20 टक्के व्याजदर आकारते. स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी (Businessman) आणि पगारदार म्हणजे नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी (Salaried) अॅक्सिस बँकेचे व्याजदर (Axis Bank Interest Rate) वेगवेगळे असतात. Bankbazaar.com वर दिलेल्या माहितीनुसार पूर्वी ते 7.95 ते 8.55 टक्के होते आणि सध्या ते 6.90 ते 8.40 टक्के आहेत. तुमच्या खिशातली 500 रुपयांची 'ती' नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या गृहकर्जासाठी साधारण किती व्याजदर आहे याचा अंदाज यातून येईल; पण व्याजदराबरोबरच बँका, वित्तीय संस्था प्रक्रिया शुल्कही (Processing Fee) आकारतात. कर्ज देण्यापूर्वी कर्ज देणाऱ्या बँकेला किंवा संस्थेला कर्जदाराची कर्ज फेडण्याची क्षमता जाणून घेणं आवश्यक असतं. बुडीत कर्जाचा धोका टाळण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न, आर्थिक पत, मालमत्तेची कायदेशीर स्थिती इत्यादी विविध निकषांनुसार त्याने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते. यासाठी बँक किंवा वित्तीय संस्थेला वेगळं मनुष्यबळ आणि संसाधनं यांची यंत्रणा निर्माण करावी लागते. त्यामुळे कर्ज देताना त्यावर प्रक्रिया शुल्क आकारलं जातं. वेगवेगळ्या बँका वेगवेगळं प्रक्रिया शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, स्टेट बँक कर्जाच्या रकमेच्या 1 टक्का, परंतु किमान 1000 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आकारते. एचडीएफसी कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा 3,000 रुपये यांपैकी जे जास्त असेल ते शुल्क आकारते. bankbazaar.com नुसार पंजाब नॅशनल बँक (PNB) 0.35 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारते. परंतु किमान 2,500 रुपये आणि कमाल 15,000 रुपये शुल्क असते. काही वेळा कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी प्रक्रिया शुल्क माफ केलं जातं. अर्थात प्रक्रिया शुल्क आकारले म्हणजे कर्ज मंजूर होण्याची हमी नसते. या प्रक्रिया शुल्काखेरीज टायटल डीडचं मेमोरँडम ऑफ डिपॉझिट किंवा MOTD म्हणजे अर्जदाराने स्वाक्षरी केलेला एक दस्तऐवज असतो, ज्यामध्ये असं नमूद केलेलं असतं, की गृहकर्ज घेण्यासाठी ग्राहकाच्या इच्छेनुसार मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली आहे. याचा अर्थ असा होतो, की ज्यासाठी तुम्ही कर्ज घेतलं आहे त्या कर्जाची परतफेड केल्यावर तुमच्या घराची किंवा मालमत्तेची संपूर्ण मालकी तुम्हाला मिळेल. या दस्तऐवजासाठी शुल्क भरणं (MOTD Fee) आवश्यक असतं. ते प्रत्येक राज्यानुसार भिन्न असतं. सर्वसाधारणपणे ते कर्जाच्या रकमेच्या 0.1 टक्का आणि 0.2 टक्का यादरम्यान असतं. काही वेळा कर्जदार एका बँकेकडून कर्ज घेतलेले असताना, दुसरीकडे कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर दुसरीकडून कर्ज घेतात. त्यासाठी कर्ज हस्तांतरित (Loan Transfer Fee) करण्याची प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करण्यासाठी रूपांतरण शुल्क आकारलं जातं. गृहकर्जाची बाजारपेठ स्पर्धात्मक असल्याने मोठ्या प्रमाणात कर्जदार असं कर्ज हस्तांतरण करत असतात. त्यामुळे अधिक स्पर्धात्मक आणि परवडणारे व्याजदर मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं कर्ज हस्तांतरित करू शकता. Paisabazaar.com नुसार, स्टेट बँक 0.50 टक्का रूपांतरण शुल्क आकारते. बँक ऑफ बडोदाचं रूपांतरण शुल्क मूळ थकबाकी अधिक कर यांच्या एकत्रित रकमेच्या 0.50 टक्के आणि कमाल 25,000 रुपये असते. दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर केंद्र सरकारने खरं कारण सांगितलं त्याचप्रमाणे कर्जाची परतफेड मुदतीआधी करण्याचीही (Prepayment of Loan) सोय असते. काही प्रमाणात किंवा संपूर्ण गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडण्याचा पर्याय असतो. अशा वेळी काही बँका काही शुल्क आकारतात. बहुतांश बँका, वित्तीय संस्था यासाठी कोणतंही प्रीपेमेंट शुल्क आकारत नाहीत. गृहकर्ज घेण्यापूर्वी प्रीपेमेंटच्या नियमांबद्दल जाणून घेणं आवश्यक असतं. कर्ज घेणारा आणि देणारा यांच्यातल्या व्यवहाराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदेशीर दस्तऐवजावर आणि स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आकारलं जातं. हे शुल्क प्रत्यक्ष खर्चावर अवलंबून असतं. कर्ज घेताना या शुल्काचाही विचार करणं आवश्यक असतं. अनेकदा कर्जाचा व्याजदर कमी असला, तरी अशा विविध प्रकारच्या शुल्कांमुळे कर्ज घेणं महाग ठरू शकतं. व्याजदरावरून स्वस्त वाटणारं कर्ज अशा शुल्कामुळे महाग ठरू शकतं हे लक्षात घ्या आणि कर्ज घेण्यापूर्वी सर्व बाबींचा नीट अभ्यास करून मगच कर्ज घेण्याचा विचार करा.
First published:

Tags: Home Loan, Loan

पुढील बातम्या