नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : सध्या सर्व गोष्टी डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे यूपीआय पेमेंटचं (UPI Payment) महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. फोनमध्ये ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठीची (Online transaction) अॅप्लिकेशन्स असली, की आर्थिक व्यवहारांसाठी इतर कशाचीही गरज भासत नाही. तरीदेखील अशा काही गोष्टी आहेत ज्यांचं महत्त्व आजही टिकून आहे. एटीएम कार्ड (ATM Card) ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. कधी कधी ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी एटीएमची आवश्यकता असते. कॅश काढण्यासाठी तासन् तास बँकेच्या रांगेत उभं राहण्यापेक्षा एटीएमच्या मदतीनं काही मिनिटांत पैसे काढणं कधीही फायद्याचं आहे.
इतर वस्तूंप्रमाणे या एटीएम कार्डलाही एक्सपायरी डेट (Expiry date) असते. त्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा नवीन एटीएम किंवा डेबिट कार्ड काढावं लागतं. पूर्वी नवीन कार्ड घेण्यासाठी बँकेमध्ये जावं लागत असे. आता बँकांनी आपल्या ग्राहकांचा तो ताणही कमी केला आहे. सध्या बँका तुम्हाला तुमचं कार्ड घरपोच देण्याची सुविधा देत आहेत.
वाचा : देशात डिजिटल बँका उभारणार, कोणतीही शाखा नसणार; नीती आयोगाचा प्रस्ताव
मुदत संपल्यानंतरही कार्ड मिळालं नाही तर?
डेबिट कार्ड कालबाह्य (एक्सपायर) झालं असेल किंवा होणार असेल, तर बँकेच्या नियमांनुसार तुम्हाला त्यापूर्वीच नवीन कार्ड घरपोच मिळतं. डेबिट कार्डची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीच बँक ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नवीन कार्ड पाठवते; मात्र कार्डची मुदत संपल्यानंतरही कार्ड मिळालं नाही, तर काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) याबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे. बँकेच्या नियमांनुसार, तुम्ही गेल्या 12 महिन्यांत एकदाही कार्ड वापरलं नसेल, तर तुमच्या घरी ऑटोमॅटिक कार्ड (ATM Card) पाठवलं जात नाही. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी कार्डचा वापर करणं आवश्यक आहे. याशिवाय तुमचं बँक खातं पॅनकार्डशी लिंक करणंही आवश्यक आहे. ज्या ग्राहकांचं अकाउंट 'फायनान्शिअल इन्क्लुजन' प्रकारचं नाही, त्यांच्या घरी कार्ड पाठवलं जातं.
वाचा : जगाला लुटून फरार झालीये ही Cryptocurrency ची क्वीन! गुंतवणूक करण्याआधी घ्या जाणून
एटीएम कार्ड एक्सपायर झाल्यानंतरही नवीन कार्ड घरी पोहोचलं नाही तर काय करावं, याबद्दलची माहिती काही दिवसांपूर्वी भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) एका ग्राहकानं ट्विट करून विचारली होती. त्या ग्राहकाचं एटीएम कार्ड ऑक्टोबर 2021मध्ये एक्सपायर झालं आहे. अद्याप त्याला नवीन नवीन कार्ड मिळालेलं नाही, म्हणून त्यानं एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलला टॅग करून ट्विट केलं. एसबीआयनं त्याला रिप्लायदेखील दिला आहे.
seeded in the account. In all other cases, Customer has to apply for a new card along with KYC documents at the branch. (2/2)
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 24, 2021
डेबिट कार्डची मुदत संपण्याच्या तीन महिने अगोदरच बँक ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नवीन कार्ड पाठवते. त्यासाठी ग्राहकानं वर्षातून किमान एकदा तरी कार्डचा वापर केलेला असावा, असं एसबीआयनं म्हटलं आहे. कार्डचा वापर केलेला असूनही नवीन कार्ड मिळालं नसेल तर केवायसीसाठी लागणारी सर्व कागदपत्रं घेऊन बँकेच्या शाखेमध्ये नवीन कार्डसाठी अर्ज करता येईल, असंही एसबीआयनं स्पष्ट केलं आहे.
एकूणच काय, तर मुदत संपल्यानंतरही नवीन कार्ड घरपोच मिळालं नाही तर गोंधळून जाऊ नका. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रं घेऊन संबंधित बँकेच्या शाखेला भेट द्या आणि नवीन कार्डसाठी अर्ज करा. बँकेनं निश्चित केलेल्या कालावधीत तुम्हाला नवीन एटीएम कार्ड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.