मुंबई, 22 फेब्रुवारी : तुम्हाला हे माहिती असेलच, की केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं (NHAI) आता सर्व गाड्यांना फास्टॅग असणं बंधनकारक केलं आहे. देशभरात कोणत्याही गाडीनं प्रवास करताना तुमच्या गाडीवर फास्टॅग असणं अनिवार्य (compulsory) आहे. मागच्या 15 फेब्रुवारीपासूनच हा नियम (rule) देशभरात अमलात आला आहे.
नियम अमलात आला असला तरी अनेकांना यात तांत्रिक अडचणी येत आहेत. नियम पाळणारे आणि नियम लागू करणारे अशा दोन्ही बाजूंनी या अडचणी उद्भवत आहेत. यातील एक अडचण म्हणजे अनेक टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅनच (Fastag scan) न होणे. हा फास्टॅग स्कॅन होत नसल्यानं खोळंबा होतो आहे. सोबतच अनेक वाहनचालकांना दुप्पट टोलही (double toll) भरावा लागतो आहे.
काय आहे FASTag संदर्भातील निर्णय?
काही दिवसांपूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय महामार्गांवरील फी प्लाझामधील सर्व लेन “फी प्लाझाची फास्टॅग लेन” म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे एनएच शुल्क अधिनियम 2008 नुसार FASTag लेनमध्ये प्रवेश करणारे FASTag न बसवलेले कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत FASTag शिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.
यासंदर्भातील मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात FASTag बसवणे अनिवार्य केले होते.
प्रवर्ग ‘एम’ म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन आणि ‘एन’ मालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.
आता समजा तुम्ही सगळे नियम पाळून Fastag गाडीला लावला आहे. त्यात पुरेसे पैसेही आहेत. म्हणजे रिचार्जही केलेला आहे. पण टोल नाक्यावर नेमका तुचा टॅग स्कॅन होत नाही. मग काय कराल? अशा वेळी कर्मचाऱ्यांकडून दंडाची रक्कम मागण्यात येऊ शकते. पण तुमची चूक नसताना दंड द्यायचं कारण नाही. प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनाही असा अनुभव आला होता. त्याविषयी वाचा..
काय करायचं अशा वेळी?
आता यावर एक सोप्पा उपाय आहे. तो म्हणजे केंद्र सरकारने काढलेला एक जुनाच जीआर (Central government GR) . 7 मे 2018 चा हा जीआर आहे. या जीआरनुसार, तुमच्या फास्टॅग वॉलेटमध्ये (Fastag Wallet) पैसे असूनही टोलनाक्यावर तुमचा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (Radio-frequency identification) फास्टॅग स्कॅन झाला नाही तर अस्वस्थ होण्याची गरज नाही. ही तुमची चूक नसल्यानं तुम्हाला टोल दंड भरण्याची अजिबातच गरज नाही. उलट तुमचा प्रवास मोफत होईल. जाणून घ्या काय आहे नियम?
जीआरमध्ये नेमकं काय लिहिलं आहे?
नॅशनल हायवे फी डिटर्मिनेशन ऑफ रेट्स अँड कलेक्शन अमेंडमेंट रूल 2018 मध्ये हे सांगितलं गेलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं G.S.R. 427 (E)अंतर्गत काढलेला जीआर सांगतो, की वापरकर्त्याकडे वैध, कार्यरत फास्ट टॅग असेल किंवा लिंक केलेल्या अकाऊंटमध्ये टोल नाका क्रॉस करताना पुरेसं बॅलन्स असेल आणि त्याला फास्ट टॅग आकारणाऱ्या टोल प्लाझावरून जात असेल आणि त्याला इलेक्ट्रॉनिक टोल जमा करणाऱ्या सुविधेच्या अकार्यक्षमतेमुळं टोल भरणं शक्य होत नसल्यास वाहनधारकाला त्या टोलवरून टोल न भरता जाण्याची परवानगी दिली जाईल. अशावेळी झिरो ट्रान्झॅक्शनची पावतीही त्याला दिली जाणं बंधनकारक आहे.'
हेही वाचा - सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा
फास्टॅग बाबतचा हा जीआर 2018 सालीच निघाला होता. मात्र अनेकांना याबाबत माहिती नव्हती. टोलवर वाहनधारकांकडून जबरदस्तीनं पैसे वसूल केले जात. आता मात्र सावध होत या जीआरची माहिती करून घेत वापर करणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag, Toll plaza, Vehicles