नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : नोकरी, व्यवसायानिमित्त एखाद्या गावात, शहरात परगावाहून आलेले लोक राहण्यासाठी भाडेतत्वावर घर (Rented House) घेतात. मोठ्या शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक असल्याने घर भाडेतत्वावर घेण्याचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतो. घर भाड्याने देणं हा अनेक घर मालकांच्या अर्थार्जनाचाही मार्ग असतो. अनेकदा घरमालक (House Owner) कोणतीही शहानिशा न करता एखाद्या भाडेकरूला घर देतात. पडताळणीशिवाय कोणालाही आपल्या घरात भाडेकरू म्हणून ठेवणं केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही धोकादायक असतं. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचं घर भाड्यानं दिलं आहे ती व्यक्ती संशयास्पद नाही. याची खात्री करणं महत्त्वाचं असतं.
सरकार आणि पोलिसही भाडेकरूची सगळी माहिती घेतल्याशिवाय घर भाडेतत्वावर देऊ नये याबबत सतर्क करत असतात. घर भाड्याने देताना करार करणं, पोलीस स्टेशनमध्ये तसंच मोठी सोसायटी असेल, तर सोसायटीला भाडेकरूची माहिती देणं या गोष्टी आता अनिवार्य करण्यात आल्या आहेत. पण अनेकदा घरमालक याकडे दुर्लक्ष करतात. नंतर काही अडचण निर्माण झाली, तर भाडेकरूची माहिती नसल्यानं काहीही करता येत नाही.
भाडेकरूची माहिती तपासणं अगदी सोपं आहे. यासाठी आधार कार्डची (Aadhaar Card) मदत घेता येते. आधार कार्डद्वारे व्यक्तीची शहानिशा केली जाऊ शकते. हे काम तुम्ही अगदी घरबसल्या काही मिनिटांत करू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), या आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने आधार कार्डच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची पडताळणी कशी करायची हे सांगितलं आहे. एका साध्या सोप्या प्रक्रियेद्वारे, तुम्ही ज्या व्यक्तीला घर भाड्याने देत आहात त्याचं आधार कार्ड खरं आहे की बनावट हे शोधू शकता.
आधार क्रमांक तपासणं -
UIDAI अर्थात भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मते, कोणताही 12 अंकी क्रमांक हा आधार क्रमांक नसतो. त्यामुळे एखाद्या भाडेकरूने आधार क्रमांक (Aadhaar Number) म्हणून एखादा 12 अंकी क्रमांक दिला, तर तो आधार क्रमांकच आहे याची खात्री करणं आवश्यक आहे. UIDAI च्या वेबसाइटद्वारे काही सेकंदात आधार क्रमांकाची पडताळणी करता येते आणि त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.
यासाठी प्रथम UIDAI च्या Resid.uidai.gov.in/verify या लिंकवर लॉग इन करा. इथे भाडेकरूने दिलेला 12 अंकी आधार क्रमांक टाका. सिक्युरिटी कोड आणि कॅप्चा भरल्यानंतर Proceed to Verify वर क्लिक करा. तुम्ही भरलेला 12 अंकी क्रमांक खरोखरच आधार क्रमांक असेल आणि तो निष्क्रिय केला नसेल, तर तो आधार क्रमांक अस्तित्वात असल्याचं आणि त्याची सद्यस्थिती म्हणजे तो सुरू आहे की निष्क्रीय आहे याची माहिती वेबसाइटवर दिसेल. तसंच व्हेरिफिकेशन (Verification) पूर्ण झाल्याचा मेसेजदेखील येईल.
अशाप्रकारे अवघ्या काही मिनिटात तुम्ही तुमच्या भाडेकरूने दिलेला आधार क्रमांक खरा आहे की नाही याची खात्री करून घेऊ शकता. यात काही गडबड आढळल्यास तुम्ही पोलिसांकडे मदत मागू शकता. आधार कार्ड हा महत्त्वाचा सरकारी पुरावा असल्याने त्यासाठी दिलेली माहिती ही खरी असते. त्यामुळे आधार कार्डची पडताळणी करून तुम्ही भाडेकरूबद्दल खात्री करून घेऊ शकता आणि संभाव्य धोक्यापासून स्वत:चं आणि इतरांचं रक्षण करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card