मुंबई, 12 जुलै: पॅनकार्ड (PAN Card) हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सर्व आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा वापर केला जातो. पॅनकार्डशिवाय तुम्ही अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहू शकता. पॅनकार्ड हे केवळ प्रौढांसाठीच बनवलं जात नाही, तर अल्पवयीन मुलांसाठीही बनवता येतं. आता अशा परिस्थितीत एक प्रश्न असाही निर्माण होतो की ज्याप्रमाणे ई-पॅन कार्ड (e-PAN Card) 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी बनवलं जातं, त्याचप्रमाणं 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही ई-पॅन कार्ड बनवलं जातं का? 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही ई-पॅन कार्ड पॅन (e-PAN Card for Minor) डाउनलोड करता येईल का? आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. ई-पॅन कार्डमध्ये (e-PAN Card) नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव अशी माहिती तसेच QR कोड असतो. यासोबतच पॅन धारकांचे बायोमेट्रिक (स्कॅन केलेला फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी) देखील असते. जे पॅन कार्डचे ऑथेंटिकेशन दर्शवते. एनएसडीएलच्या (NSDL) वेबसाइटनुसार, ई-पॅन हे पॅन कार्डइतकेच वैध आहे. वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर ते डाउनलोड करू शकतात आणि सहजपणे वापरू शकतात. तुमचे पॅन कार्ड हरवले तर तुम्ही ई-पॅन कार्ड वापरू शकता. ई-पॅन कार्ड अल्पवयीन मुलांसाठीही वैध आहे का? NSDL च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणताही भारतीय नागरिक ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकतो. ते डाऊनलोड करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, ओळख म्हणून आधार कार्ड, रंगीत छायाचित्र, स्वाक्षरी, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड तसेच ईमेल इत्यादी अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत अल्पवयीन व्यक्तीही ई-पॅन कार्ड वापरू शकते. हेही वाचा: … तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला जेलमध्ये पोहचवू शकतो, फोन वापरताना काय काळजी घ्याल?
किंमत किती आहे?
जर वापरकर्त्याने पॅन कार्ड अर्ज केल्यानंतर किंवा अपडेट केल्यापासून एक महिन्याच्या आत ई-पॅन कार्ड डाउनलोड केलं, तर मोफत ई-पॅन सुविधा दिली जाते. परंतु जर ई-पॅन जारी केल्याच्या तारखेपासून एक महिन्यानंतर, वापरकर्त्याला प्रत्येक पॅन डाउनलोडसाठी 8.26 रुपये ऑनलाइन पेमेंट (करासह) करावं लागेल. ई-पॅन डाउनलोड कसं करावं? (How to Download e-PAN card?)-
- ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी, प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- येथे ई-पॅन कार्डचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता पॅन क्रमांक टाका.
- तसेच आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर पुन्हा जन्मतारीख टाकावी लागेल.
- त्यानंतर अटी आणि नियमांवर टिक करावी लागेल.
- आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
- यानंतर कन्फर्मेशन टाकावे लागेल.
- आता ई-पॅन कार्डसाठी शुल्क भरावे लागणार आहे.
- यानंतर ई-पॅन कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल.
आता पॅन कार्ड आधारशी लिंक करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे, ज्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. सध्या पॅनकार्डला आधार लिंक करण्यासाठी 1000 रुपये शुल्क आकारले जात आहे.