आपण पैसे गुंतवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे विविध कंपन्यांशी संबंधित अनेक सल्लागार सल्ला देण्यासाठी उपस्थित असतात. मात्र जेव्हा पैसे काढायची वेळ येते तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधावी लागतात. यामुळे अनेक वेळा अशा योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान देखील होते. यामुळेच तज्ञ सल्ला देतात की, गुंतवणूक करण्यापूर्वी पैसे काढण्याचे नियम काय आहेत आणि रणनीती काय असावी हे समजून घ्यायला हवे. आज आपण याविषयी एक्सपर्ट अॅडव्हाइस जाणून घेणार आहोत.
आनंद राठी वेल्थचे डेप्युटी सीईओ फिरोज अझीझ यांनी म्युच्युअल फंड योजना आणि ELSS मधून पैसे काढण्याशी संबंधित अनेक उपयुक्त गोष्टी शेअर केल्या. या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही फायदेशीर पद्धतीने या योजनेमधून बाहेर पडू शकता.
फिरोज यांनी सल्ला दिला आहे की, रिडम्पशन करण्यासाठी आधी तुम्ही कोणत्या फंडातून पैसे काढत आहात ते तपासा. वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे नियम आहेत मग ते डेट असो किंवा इक्विटी. इक्विटीमध्ये पैसे काढताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
-पैसे काढण्यापूर्वी त्यावर कोणते कर नियम लागू होतात ते पाहा.
-पैसे काढल्यावर तुमचे कर दायित्व काय असेल हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
-दुसरीकडे, योजनेमध्ये काही एक्झिट लोड आहे की नाही किंवा पैसे काढण्यासाठी दंड आहे का ते पाहा.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिडीमची योग्य वेळ आहे की नाही हे तपासा.
तुम्ही चुकीच्या वेळी योग्य योजनेतून बाहेर पडत आहात का? हे एकदा पडताळून पाहा. त्याच वेळी, डेटमध्ये एका विशिष्ट कालावधीपूर्वी, तुम्हाला पेनल्टी लागू शकते. तुमच्या योजनेबद्दल, या वेळेबद्दल आणि वेळेपूर्वी पैसे काढल्यास पेनल्टी इत्यादीबद्दल संपूर्ण माहिती ठेवा.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमचा लॉक-इन कालावधी 3 वर्षांचा असतो. त्याच वेळी, लोक सहसा एका गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की मासिक हप्त्याद्वारे म्हणजेच SIP द्वारे ELSS मध्ये गुंतवणूक केल्यावर, प्रत्येक हप्त्यावर 3 वर्षांचा नियम लागू होईल.
तुम्ही 3 वर्षांचा शेवटचा हप्ता भरत असाल, म्हणजे 36 वा हप्ता, तर या हप्त्याचा लॉक इन पुढील 3 वर्षांसाठी देखील असेल म्हणजेच 3 वर्षात जमा केलेली संपूर्ण रक्कम एकूण 6 वर्षांमध्ये एक्झिट फ्री असेल. फिरोज यांनी महत्त्वाचा सल्ला दिला की, जर तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवली आणि गुंतवणूक दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल, तर लॉक-इन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती रक्कम काढू शकता आणि त्याच योजनेत पुन्हा गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे त्या वर्षी तुम्हाला नवीन गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.