नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : 2023 हे महागाईच्या कचाट्यात सापडणारं सलग दुसरं वर्ष असेल. महागाईमुळे अनेक देशांतील नोकरदारांच्या पगारवाढीला मोठा फटका बसला आहे. जगभरात अशी स्थिती असतानाही भारतातील कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये सर्वाधिक वाढ दिसत आहे. 68 देश आणि शहरांमधील 360 हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, ECA सॅलरी ट्रेंड्स सर्वेक्षणात जागतिक स्तरावर केवळ 37 टक्के देशांमध्ये वास्तविक वेतनवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. या सर्वेक्षणाचा हवाला देत ब्लूमबर्ग या वर्कफोर्स कन्सल्टन्सीने असं सांगितलं की, वेतनवाढीच्या घसरणीचा सर्वात जास्त फटका युरोपला बसण्याची शक्यता आहे. निरीक्षणानुसार, प्रत्यक्ष पगारांमध्ये झालेली नाममात्र वाढ आणि महागाईचा दर यांचा विचार करता युरोपातील नोकरदारांची एकूण आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. तिथं सुमारे 1.5 टक्केच पगारवाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणाने वर्तवली आहे. अहवालानुसार, यूएसमध्ये या वर्षी 4.5 टक्के रिअल टर्म घसरण दिसली आहे. घसरलेल्या चलनवाढीमुळे पुढील वर्षी ही घसरण उलट होण्याची अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणून एक टक्का रिअल-टर्म पगारवाढ होईल.
सध्या सुरू असलेल्या आर्थिक डबघाईमुळे, यूकेतील कर्मचाऱ्यांना या वर्षी सर्वात मोठा फटका बसला. 2000 मध्ये सर्वेक्षण सुरू झाल्यापासूनची ही सर्वांत वाईट आकडेवारी आहे. 3.5 टक्के सरासरी नाममात्र वेतन वाढ असूनही, सरासरी 9.1 टक्के चलनवाढीमुळे पगार वाढीत 5.6 टक्क्यांनी घट झाली आहे. 2023 मध्ये त्यात आणखी 4 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांगली पगार वाढ देण्याबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजात पहिल्या दहा देशांमध्ये आठ देश आशिया खंडातील आहेत. ECA सर्वेक्षणानुसार भारतात 4.6 टक्के, व्हिएतनाम 4.0 टक्के आणि चीनमध्ये 3.8 टक्क्यांनी पगारवाढ होऊ शकते. हेही वाचा - जेपी मॉर्गन करणार मोठी भरती; आशिया-पॅसिफिकमध्ये व्यवसाय वाढवण्यावर भर ECA इंटरनॅशनलचे आशिया रिजनल डिरेक्टर ली क्वेन म्हणाले, “आमच्या सर्वेक्षणानुसार 2023 हे वर्ष जागतिक स्तरावर कामगारांसाठी आणखी एक वाईट वर्ष ठरू शकतं. सर्वेक्षण केलेल्या देशांपैकी केवळ एक तृतीयांश देशांमध्ये वास्तविक मुदतीच्या पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जमेची बाजू म्हणजे, हे प्रमाण 2022 पेक्षा चांगलं आहे.” ECA नुसार, 2022 मध्ये सरासरी पगारवाढीमध्ये 3.8 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2023 मध्ये रिअल-टर्म पगारात वाढ होण्याची शक्यता असलेले हे टॉप-10 देश आहेत: भारत (4.6 टक्के) व्हिएतनाम (4.0 टक्के) चीन (3.8 टक्के) ब्राझील (3.4 टक्के) सौदी अरेबिया (2.3 टक्के) मलेशिया (2.2 टक्के) कंबोडिया (2.2 टक्के) थायलंड (2.2 टक्के) ओमान (2.0 टक्के) रशिया (1.9 टक्के) 2023 मध्ये रिअल-टर्म पगारात घसरण होण्याची शक्यता असलेल्या यादीतील सर्वात तळातले पाच देश: पाकिस्तान (वजा 9.9 टक्के) घाना (वजा11.9 टक्के) तुर्की (वजा 14.4 टक्के) श्रीलंका (वजा 20.5 टक्के) अर्जेंटिना (वजा 26.1 टक्के)